महापालिकाच करणार रॅपिड अँटिजेन, आरटीपीसीआर

दर दोन ते पाच घरांत कोरोनाबाधित आढळून येत असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला.

नाशिक : शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून घरोघरी रुग्ण आढळून येत आहे. परंतू बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने खरी आकडेवारी बाहेर येत नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या वतीने रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली जाणारअसल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत ७३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसतं असले तरी घरोघरी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. २७ डिसेंबर २०२१ ते ११ जानेवारी या पंधरवड्यात शहरात ७३ टक्के कोरोना रुग्ण वाढले. जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत ७,६५१ रूग्ण आढळले. त्यातील ५ हजार ५९५ रूग्ण महापालिका हद्दीतील आहेत. महापालिका व खासगी रुग्णालये, लॅब तसेच आरोग्य केंद्रांवर तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातात. त्यातून आकडेवारी बाहेर येते.

मात्र, प्रत्यक्षात शहरात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. दर दोन ते पाच घरांत कोरोनाबाधित आढळून येत असल्याचा दावा महापौर कुलकर्णी यांनी केला. रुग्णांचा खरा आकडा बाहेर येण्यासाठी ही तपासणी मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या १५ दिवसांत झालेली ७३ टक्के रूग्णवाढ लक्षात घेता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याची गरज आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी उपाय योजने गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.

शहरात नोंद झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक रुग्ण आहेत. मात्र, तपासणीअभावी तो आकडा बाहेर येत नाही. त्यामुळे तातडीने चाचणी करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आहेत.

-सतीश कुलकर्णी, महापौर