म्हसरुळला विवाहितेचा गळा चिरुन खून

gangraped a young girl at parola jalgaon and threw poison
प्रातिनिधिक छायाचित्र

म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील पेठरोड परिसरात असलेल्या पवार मळ्याच्या नाल्याजवळ संशयितांनी मोरेमळा परिसरात राहणार्‍या २३ वर्षीय विवाहितेचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अनोळखी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पतीला चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. पूजा विनोद आखाडे असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१९ ) रात्रीच्या सुमाराला पेठरोडवरील आर.टी. ओ. कार्यालयाजवळील नामको रुग्णालयसमोर मखमलाबादला जाणार्‍या रस्त्यावर पवार मळ्यानजीक नाल्याजवळ एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे म्हसरूळ पोलिसांना स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नाल्याजवळ पोलिसांना महिला रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आली. महिलेच्या गळ्यावर, कपाळावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. महिलेची ओळख पटवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी इतर पोलीस ठाण्यात बेपत्ता महिला झाल्याबाबत माहिती देण्यासाठी येते का, याची माहिती कळविली. पंचवटी पोलीस ठाण्यात विनोद आखाडे याने आपली पत्नी पूजा आखाडे बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल केल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी आले. मृतदेह दाखविल्यानंतर त्याने पत्नी पूजाचा मृतदेह असल्याचे सांगितले.

मोरे मळ्यात राहणारे पूजा व विनोद हे पतीपत्नी आहेत. विनोद याचा डीजेचा व्यवसाय आहे. पोलिसांनी विनोद याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. पूजा हिचा मारेकरी कोण आहे? कोणत्या कारणावरून तिचा खून केला? याचे कारण गुलदस्त्यातच आहे. तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मयत पूजा व मारेकरी हे रिक्षात बसून घटनास्थळी आले असावे. त्याठिकाणी वाद झाल्यावर मारेकर्‍यांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तिचा खून केला असावा, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी आहिरे करत आहेत.