मी नाशिककर करणार विमान सेवेचे ‘ब्रॅण्डिंग’

नाशिक : नाशिकमधून विमानसेवेचा विस्तार व्हावा याकरीता मी नाशिककर या संघटनेने पुढाकार घेतला असून विमानसेवेचे ब्रॅण्डिंग होण्याच्यादृष्टीने संघटनेने शहर तसेच महामार्गाच्या प्रमुख ठिकाणी विमान सेवेची माहिती देणारे फलक उभारत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

ओझर विमानतळावरुन सध्या स्पाईसजेट कंपनीची नाशिक-नवी दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या शहरांसाठी सेवा सुरू आहे. तर, 15 मार्चपासून इंडिगो कंपनीची सेवा सुरू झाली आहे. इंडिगोच्यावतीने गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जात आहे. येत्या 1 जूनपासून इंडिगोने विमानसेवेचा विस्तार केला असून नव्याने जाहीर केलेल्या शेड्यूलमध्ये अहमदाबाद, नॉर्थ गोवा, इंदूर, हैदराबाद, नागपूर, अमृतसर, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, कोइमतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकता, कोझिकोड, लखनौ, बेंगलुरु, रायपूर, राजमुंद्री, रांची, तिरुअनंतपुरम, तिरुपती, उदयपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, विजयवाडा या शहरांचा समावेश केला आहे.

नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला यानिमित्ताने चालना मिळून विकासाची गती वाढणार आहे. प्रथमच 32 शहरांना एकाच वेळी सेवा पुरविली जाणार असल्याने विकासाचा वेग वाढेल. महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा हवी ही मागणी अनेक वर्षांपासून होती ती पूर्ण होत आहे. परंतु अनेकदा विमानसेवेत खंड पडत असल्याने नाशिकची विमानसेवा बेभरवशाची असल्याचा संदेश जावून विमानसेवा विकासाला अडथळा निर्माण होतो. मात्र कोणत्याही शहराच्या विकासासाठी शहराची मुलभूत सुविधा असणे आवश्यक असतात या सेवांना बळ मिळावे याकरीता मी नाशिककर संघटनेने पुढाकार घेतला आहे. विमानसेवेच्या ब्रॅण्डिंगसाठी नाशिकमध्ये येणार्‍या पाचही मार्गांवर नाशिक विमानतळ व तेथून उपलब्ध सेवांची माहिती देणारे फलक उभारण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी ईएसडीएसचे पियुष सोमाणी, अ‍ॅक्सेस ग्रुपचे संजय कोठेकर, मी नाशिककरचे सदस्य उमेश वानखेडे, मनिष रावल, किरण चव्हाण यांच्यासोबत विविध २६ व्यावसायिक व सामाजिक संस्थांचे ८० हून अधिक प्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.

मी नाशिककरचे आवाहन 

पहिल्या टप्प्यात एकूण 61 बोर्ड्स लावण्यात आले असून यामध्ये सुला वाईन यार्ड्सने 20, अशोका बिल्डकॉनने 15, फॉक्स कंट्रोल सोल्युशन्सने 10, अ‍ॅक्सेस ग्रुपने 14, ई बनिया ग्रोसरी प्रा लि.ने 10 व विवेदा वेलनेसने 6 बोर्ड्सचा खर्च उचलला आहे. यानंतर दुसर्‍या टप्प्यामध्ये अजून ५० बोर्ड उभारण्यात येणार असून यासाठी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन ‘मी नाशिककर’ संजय कोठेकर यांनी केले आहे.