मालेगावातील करोना नियंत्रणासाठी सुक्ष्म आराखडा

रूग्णांच्या मदतीसाठी लवकरच मदतकक्ष

मालेगाव शहरामध्ये करोनाने पाय पसरविण्यास सुरुवात केल्यानंतर अल्प कालावधीतच मोठ्या प्रमाणात बाधित रुग्णांचा आकडा वाढत गेला. याकरीता संपुर्ण मालेगाव शहर कोरोनामुक्त करण्याचा ध्यास घेवून प्रत्येकाने काम करावे. तसेच शहरातील पुर्व भागातील परिस्थिती नियंत्रणात येत असतांना तालुक्यातील पश्चिम भागासह ग्रामीण भागातही लक्ष केंद्रीत करुन पुर्वतयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.

मालेगाव शहरात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी मांढरे यांनी शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील पश्चिम भागातही भविष्यातील धोके लक्षात घेवून गाफील न रहाता पुर्वतयारीसह आवश्यक त्या उपाययोजनांचा सुक्ष्म आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापन, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, माहिती व अहवाल व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक कारवाई याच्यासह कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासकांची मदत घेवून शहरातील काही मोजक्या क्षेत्रांमध्ये जावून तेथे विशेष तपासणी कॅम्पचे आयोजन करावे, रुग्णांच्या मदतीसाठी हेल्पलाईनची यंत्रणा कार्यान्वित करावी, रुग्णालयात स्वच्छतेसह रुग्णांसाठी चांगल्या दर्जाची भोजन व्यवस्थेसह पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याची व्यवस्था पुढील भेटीपूर्वी प्रत्यक्ष कार्यान्वित झालेली न दिसल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल असे आदेशही त्यांनी उपस्थितांना दिले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, शिवकुमार आवळकंठे, धान्य वितरण डॉ.सुशिलकुमार शिंदे, डॉ.अरुण पवार यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

शहरातील खाजगी रूग्णालये सुरू करा
करोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण वाढत असतांना दुसर्या बाजूला इतर कारणांमुळे मृतांचा आकडाही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालय हे ‘नॉन कोविड’ रुग्णालय घोषित करण्यात आले असून तेथील सर्व कक्ष हे निर्जतुंकीकरणासह सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगात आणावे. खाजगी रुग्णालये तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी सर्व खाजगी डॉक्टर्सची बैठक घेवून त्यांना तशा सुचना द्याव्यात असे निर्देशनही यावेळी देण्यात आले.