घरमहाराष्ट्रनाशिकमंत्र्यांचा दौरा अन् खड्डे बुजवण्याचा खटाटोप

मंत्र्यांचा दौरा अन् खड्डे बुजवण्याचा खटाटोप

Subscribe

कळवणच्या मेनरोडची दयनीय अवस्था; नागरिकांमध्ये संताप

कळवण : गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने काम सुरू असलेल्या कळवणच्या मेनरोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने दररोजच कळवणकर खड्ड्यांचा त्रास सहन करत असून मागील काही महिन्यांत केवळ खड्डे दुरुस्तीची प्रतीक्षा असताना शनिवारी (दि. २) मंत्री जयंत पाटील यांच्या दौर्‍याने नागरिकांना अंशतः दिलासा मिळाला खरा, पण बुजलेले खड्डेही नीट न बुजल्याने खड्डे बुजविण्याचा खटाटोप आणखी किती दिवस चालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मेनरोडचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून अत्यंत संथगतीने हे काम सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेवर कुठलाच फरक पडत नसल्याने सर्वांनीच हात टेकले आहेत. विशेष म्हणजे संबंधित काम करणारी यंत्रणा लोकप्रतिनिधींचेही काहीही ऐकत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र काम प्रगतीपथावर असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न या यंत्रणेकडून सोयीस्कररित्या केला जात असून एखादा मंत्री तालुक्याच्या दौर्‍यावर आला की, खड्डे बुजविण्याचा एककलमी कार्यक्रम या यंत्रणेकडून राबविण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिक अवाक झाले आहेत.

- Advertisement -

मागील महिन्यात केंद्रीय मंत्री तथा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खासदार डॉ. भारती पवार या कळवण दौर्‍यावर आल्या होत्या. त्याच्या आदल्या दिवशी काम करणार्‍या यंत्रणेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र नंतर पुन्हा नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला.गेल्या काही दिवसात हे काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू असून ज्या बाजूने वाहतूक सुरू आहे तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने दररोज नागरिकांच्या तोंडून यंत्रणेच्या नावाने ओरड होत आहे. असे असताना गेल्या काही दिवसात पाऊस, चिखल, खड्डे आणि डबके यातून नागरिक मार्गक्रमण करत असून अक्षरशः मरणयातना सहन करत मार्गक्रमण करावे लागत आहे. दरम्यान, शनिवारी (दि. २) राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त कळवण येथे येत असल्याने संबंधित यंत्रणेने रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना थोडा दिलासा दिला असला तरी परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत शासन मंत्र्यांसाठी की दररोज मरणयातना भोगत असलेल्या नागरिकांसाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -