घरमहाराष्ट्रनाशिकहरवलेला संवाद गवसला ‘चाईल्डलाइन’मध्ये !

हरवलेला संवाद गवसला ‘चाईल्डलाइन’मध्ये !

Subscribe

महिन्याला गप्पा मारण्यासाठी येतात ८० कॉल्स; आई नसल्याचे दु:ख तर आईच्या त्रासाचीही केली जाते तक्रार

मला आईची खूप आठवण येते. तुम्ही आईला घेऊन याल का, असा सुन्न करणारा प्रश्न विचारणारा चिमुरडा चाईल्ड लाईनवर बालसुलभ आग्रह धरतो, आई देवाघरी गेली म्हणजे नक्की काय झाले हे त्याला माहितीच नाही.. दुसरीकडे एक कॉल असाही येतो ज्यात बालक म्हणतो, ‘मला आई नको, तुम्ही माझ्या आईला घरातून घेऊन जा’.. आई नेहमीच आपल्यावर अन्याय करते, अशी त्याची भावना.. दोन्ही परस्परपुरक घटना असल्या तरीही त्यातील धागा मात्र एक आहे आणि तो म्हणजे भावनिक आधार नसलेल्या बालकांना कुणाशीतरी संवाद साधायचा असतो. कुटुंबात संवाद गमावलेले असे सरासरी ८० मुले चाईल्ड लाईनकडे दरमहिन्याला मुक्तपणे व्यक्त होतात. मन मोकळे करतात आणि त्यातून त्यांचे प्रश्न सुटतात देखील !

बालकांचे शारीरिक आणि मानसिक शोषण थांबवण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चाईल्ड लाईन संस्था कार्यरत आहे. या संस्थेला महिन्यात हजारो कॉल्स येतात. यात काही फेक कॉल्स असतात, तर काही वैद्यकीय मदतीसाठी. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अडलेले मुलेही कॉल करून मदतीची मागणी करतात.

- Advertisement -

आत्महत्येपासून केले परावृत्त

बारावीला कमी गुण मिळाले म्हणून संतप्त वडिलांना घाबरून आत्महत्येचा विचार करणार्‍या एका मुलीने निकालानंतर चाईल्डलाईनला कॉल केला. यावेळी संबंधित समुपदेशकांनी आयुष्याचे महत्व, अपयश आलेल्यांनी नंतर घेतलेली उभारी अशा बाबी सांगत तिचा विचार बदलवला.

जावई म्हणून चिडवल्याने नाराजी

मामाच्या गावाला गेल्यावर आपल्याला सगळेच जावई म्हणून चिडवतात, अशीही तक्रार एका आठवीच्या विद्यार्थ्याने चाईल्ड लाईनकडे केली. आपली मामे बहिण खूप छोटी असून तिला कडेवर घेतल्यावर सगळेच आपल्याला चिडवतात. त्यामुळे गावी जावेसेच वाटत नाही. पण मामा-मामी खुप प्रेमळ आहेत. आपल्याला त्यांची नेहमी आठवण येते असे त्याने सांगितले. समुपदेशकाने मुलाची समजूत घातल्यानंतर आता मुलगा काहीना काही कारणाने दर महिन्याला एकदा तरी चाईल्ड लाईनला कॉल करतो.

- Advertisement -

मुला-मुलीतील भेदाने त्रस्त

आपण जिन्स घातली तर आईला आवडत नाही. मैत्रीणीकडे मुक्कामी राहू दिले जात नाही. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव घरात क्षणाक्षणाला चालू असतो, अशी तक्रार एका किशोरवयीन मुलीने केली होती. यावेळी समुपदेशकांनी मुलीच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले.

मनमोकळे करण्यासाठी मिमीक्री

एक मुलगा चाईल्ड लाईनला कॉल करून चित्रपटातील अभिनेत्यांचा आवाज काढून दाखवतो. या मुलाची माहिती घेतली असता आई-वडिल मजुरी करतात. रात्री थकून भागून आल्यावर कुटूंबात फार संवाद होत नाही. त्यामुळे मुलाने मन मोकळे करायला चाईल्ड लाईनचा सहारा घेतल्याचे निदर्शनास आले.

आईविषयी तक्रार

एका लहान मुलाने आपल्याला आईकडे राहायचे नाही, अशी तक्रार केली. काही काळानंतर लक्षात आले की मुलाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. मुलाची आई मानसिक रुग्ण होती. ती मुलाला नेहमीच मारायची आणि रागवायची. अखेर मुलाची रवानगी बालगृहात करण्यात आली.

कॉल विनाशुल्क असल्यामुळे मुले मोकळेपणाने बोलतात

महिन्यातून किमान २०० कॉल्स चाईल्ड लाईनला प्राप्त होतात; परंतु यातील सुमारे ७०-८० कॉल्स हे गप्पा मारण्यासाठी असतात. ज्या मुलांना एखादी गोष्ट दुसर्‍याला सांगता येत नाही किंवा ज्यांना संवाद साधण्यासाठी जवळचे कुणी नसते ते चाईल्ड लाईनला १०९८ या क्रमांकावर कॉल करतात. हा कॉल विनाशुल्क असल्यामुळे मुले मोकळेपणाने बोलतात. यात अनेक मुले आपल्या पालकांच्या मोबाइलवरून चोरून-लपून कॉल करतात.– सुवर्णा वाघ, समुपदेशक,नवजीवन फाउंडेशन, चाईल्डलाइन, नाशिक.

हरवलेला संवाद गवसला ‘चाईल्डलाइन’मध्ये !
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -