घर महाराष्ट्र नाशिक रिक्षा-टॅक्सी बंदला संमिश्र प्रतिसाद; सिटीलिंक बस अडवण्याचा प्रयत्न

रिक्षा-टॅक्सी बंदला संमिश्र प्रतिसाद; सिटीलिंक बस अडवण्याचा प्रयत्न

Subscribe

नाशिक : श्रमिक सेनेने पुकारलेल्या रिक्षा टॅक्सी बंदला मंगळवारी (दि.१२) शहरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. दिवसभर शहरातील अनेक रिक्षा स्टॅण्डवर रिक्षाचालक सुरळीत प्रवाशी वाहतूक करत असल्याने नागरिकांचे होणारे हाल टळले. विशेष म्हणजे, या बंदमध्ये शाळकरी वाहतूक करणार्‍यांनी सहभाग नोंदवला नसल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

श्रमिक सेनेतर्फे रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक मालक यांनी आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, त्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. १२ रोजी रिक्षा, टॅक्सी बंद पुकारला होता. श्रमिक सेना संस्थापक सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे, शंकर बागुल, नवाज सय्यद, राजेंद्र वागले यांच्यासह रिक्षा, टॅक्सी चालकांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

श्रमिक सेनेने पुकारलेल्या या बंदला म्हणावा तास प्रतिसाद यावेळी मिळाला नाही. शहरात अनेक ठिकाणी रिक्षा, टॅक्सी सुरळीत सुरु असल्याने त्याचा कुठलाही फटका सामान्य प्रवाशी आणि नाशिककरांना बसला नाही. विशेष म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा, टॅक्सी चालकांनी या बंद पासून दूर राहणे पसंत केल्याने पालकांची होणारी मोठी परवड थांबलेली पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे पंचवटी परिसरात परराज्यातून आलेल्या भाविकांची नाशिक दर्शन सेवा पंचवटी परिसरात सुरळीत असल्याचे दिसून आले.

सिटीलिंक अडवण्याचा प्रयत्न 

श्रमिक सेनेच्या वतीने जिल्हयाभरात रिक्षा, टॅक्सी, टेम्पो बंदची हाक देण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले. दरम्यान, या ठिय्या आंदोलनावेळी तेथून एक सिटीलिंक बस जात असताना आंदोलनकर्त्या रिक्षा, टॅक्सी चालकांनी ती बस अडवण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलनकर्ते तर थेट बस समोर झोपले. तसेच यावेळी मोठी घोषणाबाजी सुरू झाली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांनी तात्काळ आंदोलनकर्त्यांना आवर घालत बसचा रस्ता मोकळा करून दिला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -