घरमहाराष्ट्रनाशिकदेवळालीतील प्रश्नांचे गार्‍हाणे शरद पवारांच्या दारी

देवळालीतील प्रश्नांचे गार्‍हाणे शरद पवारांच्या दारी

Subscribe

प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत शरद पवारांनी आश्वासित केल्याची माहिती

विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली येथील शेतकर्‍यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर असलेले श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे नाव कमी करणे, एकलहरा येथील विद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करणे आणि नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करणे या तीन महत्त्वाच्या प्रश्नांचे गार्‍हाणे देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मांडले. तसेच, याबाबत त्यांनी निवेदन देत सखोल चर्चा केली.

पवारांच्या अध्यक्षतेत शासन स्तरावर बैठक आयोजित शेतकरी व कामगारांच्या जिव्हाळ्याचे हे प्रश्न सोडवावेत, अशी विनंतीही आहिरे यांनी यावेळी केली. विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली येथील शेतकर्‍यांच्या वडिलोपार्जित जमिनींच्या सातबारा उतार्‍यावर श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे नाव आहे. ते इनाम वर्ग-३ व भोगवटदार-२ हे शेरे कमी करावेत, अशी सुमारे पाच हजार शेतकर्‍यांची मागणी आहे. गेल्या ४६ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा विकास खुंटला आहे. तसेच, अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

एकलहरा येथील विद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू व्हावा यासाठी त्या परिसरातील कामगारांनी अनेकवेळा निवेदने देत आंदोलनही केले आहे. कामगारांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी तसेच, वीजनिर्मितीचेही सातत्य समतोल कायम राखण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक सहकारी साखर कारखाना हा पाच तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आशास्थान आहे. दिवंगत स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब पोतनीस यांच्यासह तत्कालीन शेतकरी नेत्यांनी पुढाकार घेऊन हा कारखाना सुरू केलेला आहे. या कारखान्यामुळे शेतकर्‍यांच्या विकासाला चालना मिळाली. आज ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. एक हमखास पैसे देणारे पीक म्हणून उसाकडे शेतकरी बघतात. तेव्हा हा कारखानाही शेतकर्‍यांच्या हितासाठी व परिसराच्या विकासासाठी सुरू होणे अत्यावश्यक आहे. तो सुरू व्हावा म्हणून शेतकरी प्राण कंठाशी लावून वाट पाहत आहेत, असेही आमदार आहिरे यांनी सांगितले. या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत शरद पवारांनी आश्वासित केल्याची माहितीही त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -