भोंगा आंदोलन प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनाही अखेर अटक

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यानी देखील नाशिक मध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलना दरम्यान किरकोळ प्रसंग वगळता मोठी कोणतीही घटना घडली नाही. त्यानंतर पोलीस यंत्रणेने जलद पाऊल उचलत मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करून त्यांना कोर्टात हजर केले. कोर्टाने या सर्व कार्यकर्त्यांना जमीन देताना १५ दिवसांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय दिला.

मात्र, या दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आणि शहराध्यक्ष दिलीप दातीर हे आंदोलनाच्या दिवसापासूनच फरार होते. त्यांच्या विरोधात भद्रकाली आणि सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्याबाबत पोलीस या दोघांचाही शोध घेत होते.

दरम्यान, शनिवारी दिलीप दातीर यांना युनिट दोनच्या पथकाने पाथर्डी फाटा येथून अटक केल्यानंतर आज (दि.९) अंकुश पवार यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना अंजनेरी येथून अटक करण्यात असून भद्रकाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्याची शक्यता असून, कोर्ट त्यांनाही १५ दिवसांसाठी हद्दपार करू शकते.