नाशिक : जुन्या नाशकातील ३० वर्ष जुन्या वीज वाहक तारा भूमिगत करण्यात याव्या यासाठी मनसे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार व ग्राहक उपभोक्ता संरक्षण समतीचे महाराष्ट्र मार्गदर्शक तथा नागरिक समस्या निवारण समिती प्रमुख संदीप जगझाप यांनी पुढाकार घेत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले. नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना गाडगे महाराज चौक ते तिवंधा चौक मार्गाचे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निमंत्रण दिले.
महावितरणची ३० वर्ष जुनी यंत्रणा बदलावी व धोकादायक वीज वाहक तारा ह्या भूमिगत कऱ्याव्या अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केली आहे. गणपती विसर्जनाची पारंपरिक मिरवणूक याच मार्गावरून जाते. यासह कुंभमेळ्यासाठी हा परिसर महत्वाचा आहे. यासोबत हा संपूर्णं परिसर नाशिक शहराची महत्वपूर्ण बाजारपेठ आहे. यामुळे याठिकाणी कोणतीही दुर्घटना घडली तर त्यातून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील ज्या भागात विद्युत तारा भूमिगत करण्यात आलेल्या आहे त्याठिकाणी अनेक अडचणी दूर होऊन सुरक्षितता वाढली आहे. त्यामुळे जुने नाशिक परिसरातीलही विद्युत तारा लवकरात लवकर भूमिगत कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
या संदर्भातील निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता नाशिक शहर १ चेतन वाडे यांना देण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत उपाययोजनाबाबत सविस्तर चर्चाही करण्यात आली. दरम्यान याबाबत सकारात्मक भूमिका घेत दोन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन चेतन वाडे यांनी दिले. यावेळी दर्शन लढा, मंदार कावळे, चारुदत्त भिंगारकर, विराज काटे, सोनल गायधनी, पप्पू मराठे, विशाल पवार, रोहन निमकर, विकी जाधव, ललित जाधव, रविंद्र पवार, अमोल वाघ, चैतन्य गायधनी, भूशन जुन्नरे आदि उपस्थित होते.
वीज वाहक तारा, पोल हे रस्ताच्या माधोमध असल्याने ट्राफिकची समस्या नेहमीचीच असते. विद्युत तरांमध्ये सातत्याने स्पार्किंग होत असते. ही बाबत अत्यंत धोकेदायक असून याबाबत अभियंता चेतन वाडे यांच्यासमोर सविस्तर चर्चा करत काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत. येत्या काळात गाडगे महाराज चौक ते तीवंधा चौक हा मार्ग अत्याधुनिक आणि ट्रॅफिकमुक्त करण्याचा देखील मानस आहे : अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष, मनसे