घरमहाराष्ट्रनाशिक१६ जुलैपासून नाशकात 'राजनीती'

१६ जुलैपासून नाशकात ‘राजनीती’

Subscribe

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा तीन दिवस नाशिक दौरा

मनसेच्या बालेकिल्ल्याला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी येत्या १६, १७ आणि १८ जुलैला मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांसमवेत महत्वपूर्ण बैठका होतील. शिवाय अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठीही कान टोचणीचा कार्यक्रम होणार असल्याचे समजते.

पक्षस्थापनेपासून नाशिक मनसेचा गड राहिला आहे. शहरात तीन आमदार, महापालिकेची एकहाती सत्ता असे भरघोस यश नाशिककरांनी मनसेला दिले होते. परंतु, नेत्यांच्या हेव्यादाव्यांमुळे आणि वर्चस्ववादाच्या राजकारणामुळे अल्पकाळातच नाशिकमध्ये पक्षाला घरघर लागली. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या ४० वरून थेट पाचवर घसरली होती. स्थायी समितीवर एक सदस्य जाण्यासाठी पक्षाला अपक्षांची मदत घेण्याची वेळ आली. नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे नाशिकमध्ये चांगले काम करूनदेखील पक्षाला अपयश आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत तीन विधानसभा मतदारसंघांसाठी पक्षाने उमेदवार उभे केले असले, तरी त्यांच्या पाठीशी अपेक्षित बळ लावले नाही. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सभा घेऊन वातावरणनिर्मिती केली असली, तरी फारसे यश आले नाही. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने आपली ताकद पुन्हा वाढवायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

पक्षात गटबाजी नसावी या हेतूने पदाधिकार्‍यांच्या तक्रारी करणार्‍यांचेच पदे काढण्याची रणनिती पक्षाकडून आखण्यात आली. त्यामुळे आता पक्षात सगळेच एकदिलाने काम करताना दिसत आहे. अनेक तरुणांना मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी देखील पक्षाच्या वाढीसाठी हातभार लावणे सुरु केले आहे. पक्षातील जुने पदाधिकारी आणि अन्य पक्षातून मनसेमय झालेले पदाधिकारी यांनी हातात हात धरुन कामाला सुरुवात केली आहे. परिणामी शहरात मनसेचा जोर वाढताना दिसत आहे. राज्यातील सत्ताधारी अस्तिर असल्यामुळे महाविकास आघाडीतील पदाधिकार्‍यांना नाशकात येण्यास वेळ नाही. या संधीचा फायदा घेत राज यांनी येत्या १६, १७ आणि १८ जुलैला नाशिक दौरा निश्चित केला आहे. मध्यंतरीच्या काळात राज यांचा तीन दिवसीय नाशिक दौरा निश्चित झाला होता. परंतु एक विवाह सोहळ्याला हजेरी लावून ते मुंबईला एका दिवसात परतले होते. त्यानंतर आता येत्या १६ पासून होणार्‍या दौर्‍याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. या दौर्‍याविषयी अधिकृत माहिती पक्षाकडून अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे दौर्‍याचे स्वरुप काय असेल याविषयी पदाधिकारीही अनभिज्ञ आहेत. मात्र महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या दौर्‍यात बैठका घेण्यात येतील हे निश्चित आहे. शिवाय मध्यंतरीच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर काही कार्यकर्त्यांची झाडाझडतीही होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -