सुरगाणा पूरग्रस्तांना मनसेचा मदतीचा हात

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे १२ जुलै रोजी सुरगाणा तालुक्यातील अलंगून बंधारा फुटल्याने येथील नागरिकांचे संसार पूराच्या पाण्यात वाहून गेले. येथील अनेक घरे पाण्याखाली गेली. या पुरग्रस्तांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी धावून गेले असून, गावात जाऊन तेथील पुरग्रस्तांना त्यांनी संसारपयोगी वस्तुंचे वाटप केले.
जिल्ह्याला गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. पावसाचा जोर वाढल्याने त्यातच बंधारा फुटून अनेक घरे पाण्याखाली गेली. यामुळे नागरिकांचे संसार पुराच्या पाण्याने उध्दवस्त झाले.

घटनास्थळी कुठली जीवितहानी झाली नसली तरी अनेक घर पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अलंगुन गाव पाण्याखाली होते. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. आठ दिवसानंतर येथील पूरपरिस्थिती ओसरली असून हे नागरिक घरी परतले असले तरी, घरांसह संसाराची मोठी हानी झाली आहे. चिखल, गाळाचे साम्राज्य पसरले आहे. या परिस्थितीत नागरिकांचे हात पाहून मनसे पदाधिकार्‍यांनी अलंगुण येथे धाव घेत नागरिकांची भेट घेतली. प्रत्येक घराघरांत जाऊन पदाधिकार्‍यांनी नागरिकांची विचारपूस केली. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. या कुटूंबांना मदतीचा हात देताना मनसेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पेठ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, मनसे मध्य नाशिक अध्यक्ष सत्यम खंडाळे, मनविसे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्याम गोहाड, नाशिक शहराध्यक्ष संदेश जगताप, उमेश वाघ यांसह स्थानिक मनसैनिक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

पूरपरिस्थितीमुळे अलंगुण गावातील कुटुंबांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. लोकप्रतिनिधी केवळ आपापल्या भागापुरता विचार करत असतांना या नागरीकांकडे मात्र तितकेसेच लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे मनसेने या भागात येऊन पुरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. येथील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून यापुढेही त्यांना आवश्यक सर्वेतोपरी मदत मनसेच्या माध्यमातून केली जाईल. : अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष, मनसे