नाशिक : जुने सिडको येथील भाजीविक्रेता संदीप आठवले खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या खटकी गँगवर तरुणाला जबर मारहाण केल्याचा स्वतंत्र गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ओलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी खटकी गँगवरही मोक्का कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यावर कारवाही सुरु असल्याचे आयुक्त शिंदे यांनी सोमवारी (दि.२८) सांगितले.
सिडकोतील शिवाजी चौकात गुरुवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजता सहा ते सात जणांच्या खटकी गँगने इन्स्टाग्रामवर झालेल्या वाद आणि मारहाणीचा बदला घेण्यासाठी भाजीविक्रेता संदीप आठवलेवर सपासप वार करुन निर्घृण हत्या केली. त्यानंतर पाच तरुणांसह तीन अल्यवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.
संदीप आठवले खूनप्रकरणातील खटकी गँग अटकेत असून, त्यांनी शहरात विविध ठिकाणी मारहाणीसह अन्य गंभीर गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यात प्रणव प्रभाकर आगळे (रा. संत कबीरनगर, गंगापूर रोड. मूळ रा. गवळी पिंप्री, ता. सोनपेठ, जि. परभणी) याने खटकी गँगविरोधात मारहाणीची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास तो कॉलेज रोडवरील चाय केटली कॅफेत बसला असताना संशयित ओम प्रकाश पवार ऊर्फ मोठा खटकी, ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, मॅग्या मोरे, प्रणय पगार (सर्वजण रा. सिडको) हे त्याठिकाणी आले. मागील भांडणाची कुरापत काढून तिघांनी आगळे यास शिवीगाळ करुन दांडक्याने बेदम मारहाण केली होती. परंतु, संशयितांच्या दहशतीमुळे त्याने पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र, खटकी गँगचे काळे कारनामे उघड होत असल्याने व त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असल्याने त्याने हिंमत करुन फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
खटकीचे नेटवर्क अधिक मोठे ?
संदीप आठवले खून प्रकरणानंतर ओम पवार उर्फ ओम्या खटकी तसेच त्याचे इतर काही साथीदार यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याआधी कॉलेजरोड परिसरात देखील १८ ऑगस्ट रोजी ओम आणि त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. तसेच, आठवले खून प्रकरणानंतर पंचवटी परिसरात खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील अटक केलेल्या तिघांचेही लागेबांधे खटकी गॅंग सोबत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खटकी गँगचे नेटवर्क अधिक मोठे आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.