घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरीतल्या तीन शिक्षकांच्या अकाली निधनाने गावावर शोककळा

इगतपुरीतल्या तीन शिक्षकांच्या अकाली निधनाने गावावर शोककळा

Subscribe

तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत शिक्षक, विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली

वाल्मिक गवांदे, इगतपुरी : ज्ञानधारा रुजवणार्‍या तीन शिक्षकांचा अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यात वाहू लागल्या अश्रूधारा अशी स्थिती काल पहावयास मिळाली. ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकांच्या अशा अकाली जाण्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे समनेरा, मालुंजे, धोंगडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची घंटा वाजलीच नाही. येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत या शिक्षकांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली.

अपघाताची घटना समजताच तालुक्यातील इतर शिक्षकांनी जबर जखमी असलेल्या शिक्षकांच्या चौकशीसाठी रूग्णालयात एकच गर्दी केली होती. यानंतर रात्री नाशिक येथील वेगवेगळ्या ठिकाणी या अपघातात मृत पावलेल्या शिक्षकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिक्षक उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेमुळे दु:खाच्या सागरात बुडालेल्या ९३२ शिक्षकांच्या चुलीच पेटल्या नसल्याचे पहावयास मिळाले.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी मालुंजे, समनेरा, धोंगडवाडीत स्मशान शांतता होती तर ही तीन गावे वगळता तालुक्यातील इतर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये मयत शिक्षकांच्या प्रतिमेस पुष्पहार घालत शिक्षक व विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. मालुंजे येथे १ ली ते ८ वी पर्यंत वर्ग असून एकूण १३५ विद्यार्थ्यांना ६ शिक्षक ज्ञानदानाचे काम करत होते. धोंगडवाडी येथे १ ली ते ४ पर्यंतच्या वर्गात ३५ विद्यार्थ्यांना २ शिक्षक होते. समनेरा येथे १ ली ते ८ वी पर्यतच्या वर्गात १२२ विद्यार्थ्यांना ३ शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत होते. मात्र या घटनेमुळे प्रत्येक शाळेतील एक शिक्षक या अपघातात मृत्युमुखी पावले.

बुधवारी तालुक्यातील मुंढेगांव येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरगाव जाणार्‍या कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. विशेष म्हणजे याच दरम्यान मुंढेगावहून नाशिककडे जाणार्‍या सहा शिक्षकांच्या कारवर हा कंटेनर आदळल्याने कारमधील धनंजय कापडणीस, किशोर राजाराम पवार, जोत्स्ना टिल्लू हे जागीच ठार झाले तर गितांजली कापडणीस-सोनवणे, शेवंता दादू रकीबे हे जखमी झाले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -