Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक एमएसडब्लूचे माजी विद्यार्थी २४ वर्षानंतर आले एकत्र

एमएसडब्लूचे माजी विद्यार्थी २४ वर्षानंतर आले एकत्र

Subscribe

नाशिक : वयाच्या पंचेशाळीनंतरही कॉलेजमध्येच असल्याचा भाव.. २४ वर्षांपूर्वीच्या मोरपंखी आठवणीत रममाण झालेली मने… आपल्या प्रगतीचा आलेख मांडतांनाच सामाजिक बांधिलकी कशी जपली याची परिचयात दिलेली साक्ष… त्यावेळी मित्रांनी काढलेल्या खोड्या, जुने किस्से आणि वहिनींच्या टपरीवरच्या जुन्या गुजगोष्टी यांना उजाळा देत मविप्र प्रणित समाजकार्य महाविद्यालयातील (एमएसडब्लू) १९९९ च्या बॅचचा स्नेहमेळा उत्साहात रंगला. सदाबहार गिते आणि त्यावर झालेले अजब-गजब नृत्य याने या मेळाव्याला ‘चार चाँद’ लावले.

गंगापूर रोडवरील निसर्गरम्य आणि खेड्यात आल्याची अनुभूती देणार्‍या हॉटेल विल डिलीशियसमध्ये झालेल्या या स्नेहमेळ्यास नाशिकसह पुणे आणि मुंबईतून माजी विद्यार्थी उपस्थित होते. सगळ्यांना कायमस्वरुपी सोडून गेलेल्या पाच माजी विद्यार्थ्यांना प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर ओळख-परिचय करुन देण्यात आला. यावेळी प्रत्येकाने कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या कामाची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर संदीप मुळाणे याने ‘जीवन के दिन छोटे सही’, ‘मिले हो तूम हमको’ यांसारखे गिते सादर करुन माहोल बनवला. ‘दु:ख अडवायला उंबर्‍यासारखा.. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा..’ या गितावर झालेली हळवी मने मैत्री अधिक घट्ट करण्याची ग्वाही देऊ लागली.

- Advertisement -

दत्ता शेळकेने ‘सोचेंगे तुम्हे प्यार कर के नहीं’ हे गित गात उपस्थितांना नृत्य करण्यास उर्मी दिली. ‘पल पल दिल के पास’, ‘जादू तेरी नजर’ या गितालाही सर्वच मित्र-मैत्रीणींनी डोक्यावर घेतले. सचिन कटारेने ‘चलते चलते मेरे ये गित’ हे गाणे सादर करीत कुणालाही ‘अलिविदा’ न करण्याची विनवणी केली. या तिघा गायकांसह रामा जाधव याने ‘झिंग झिंग झिंगाट’ गाणे सादर करुन सार्‍यांनाच मनसोक्तपणे थिरकायला भाग पाडले. हा स्नेहमेळा केवळ मजा-मस्तीसाठी नसून सामाजिक बांधिलकी जपण्याची जी शिकवण महाविद्यालयाने दिली ती एकमेकांच्या साथीने पुढेही अव्याहतपणे चालू ठेवण्याची ग्वाही यावेळी सार्‍यांनी दिली. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतांनाच एकमेकांच्या प्रगतीच्या वाटा प्रशस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या आणाभाका यावेळी खाण्यात आल्या. स्नेह मेळ्यास ज्योती यादव, ज्योती सरोदे, मोहिनी गायकवाड, कांचन वारुळे, सुचित्रा पवार, अनिता चौधरी, प्रा. चंद्रप्रभा कदम, प्रतिभा आहिरे, हेमंत इसे, प्रशांत साळवे, हेमंत परदेशी, दत्ता गोरे, अर्जुन पवार, राजेश गोसावी, राजेश महाले, धोंडीराम कहांडोळ, भालचंद्र कोरडे, सुनील कोतवाल, हेमंत यावलकर, गोरख रुमणे, महेश बागूल, हेमंत भोसले आदी उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -