घरमहाराष्ट्रनाशिकम्युकरमायकोसिसच नव्हे तर कॅन्सर, एचआयव्ही रुग्णांचेही हाल

म्युकरमायकोसिसच नव्हे तर कॅन्सर, एचआयव्ही रुग्णांचेही हाल

Subscribe

अ‍ॅम्फोटेरेसिन-बी इंजेक्शनवरील सरकारी निर्बंध ठरताहेत जीवघेणे, खासगी हॉस्पिटलपुढेही उपचारांचे आव्हान

म्युकरमायकोसिस आजारामुळे अचानक चर्चेत आलेले अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन कॅन्सर, एचआयव्ही आणि किडनीसारख्या गंभीर आजारातही महत्त्वाचे ठरते. मात्र, या इंजेक्शनच्या थेट विक्रीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्याने सर्वच रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार करणारे खासगी हॉस्पिटल्सदेखील सरकारी यंत्रणांच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत.

कोरोना संसर्गातून बर्‍या झालेल्या अनेक मधुमेही, तसेच प्रतिकारशक्ती क्षीण झालेल्या व्यक्ती म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेत आहेत. अशा रुग्णांसाठी अ‍ॅम्फोटेरेसिन-बी हे इंजेक्शन अत्यंत प्रभावी ठरत असते. मात्र, प्रत्येक रुग्णाला दररोज किमान ५ ते २० इंजेक्शन्स लागतात. त्यामुळे गेल्या महिन्यात या इंजेक्शन्सची मागणी अचानक वाढून काळाबाजारही सुरू झाला होता. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रेमडेसिवीरप्रमाणेच या इंजेक्शनसाठीही सिव्हील हॉस्पिटल आणि महापालिका यांच्या माध्यमातून वितरणाची व्यवस्था उभी केली. यामुळे वितरणातील त्रुटी दूर झाल्या मात्र, आजही पुरेशा प्रमाणात इंजेक्शन्सचा पुरवठा झालेला नाही.

- Advertisement -

शरीरांतर्गत बुरशीची वाढ रोखण्यासाठी लायपोझोमल अर्थात अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन परिणामकारक ठरते. त्यामुळे एचआयव्ही, ब्लड कॅन्सर, किडनीविकार असलेल्या गंभीर रुग्णांमध्येदेखील बुरशीचा त्रास होऊ नये, म्हणून अ‍ॅम्फोटेरेसिन वापरले जाते. मात्र, सरकारी नियंत्रणामुळे आता रुग्णांसह त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे. उपचारासाठी रुग्णाला नकार देणे मानवी दृष्टीकोनातून योग्य नाही आणि त्याला दाखल करुन घेतले तर उपचार करायचे तरी कसे, अशा पेचात खासगी हॉस्पिटल्स सापडलेत.

अन्य आजारांचे रुग्ण अचानक दाखल झाल्यास त्यांच्यासाठी हे इंजेक्शन अतिरिक्त ठेवण्याचीही मुभा रुग्णालयांना नाही. तसेच, एकाचे इंजेक्शन दुसर्‍यालाही वापरता येत नाही. कारण, तसे झाले तर कारवाईची जोखीम असते. त्यामुळे आता यंत्रणांनीच या प्रश्नी उपाय शोधण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

मागणी नोंदवली ५० इंजेक्शन्सची दिले एक

पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलने महापालिकेकडे ५० इंजेक्शन्सची नोंदणी केली. मात्र, संबंधित हॉस्पिटलचा प्रतिनिधी महापालिकेत गेल्यावर संबंधितांनी त्याच्या हाती केवळ एक इंजेक्शन दिले. यंत्रणांच्या अशा कारभारामुळे उपचार करावेत तरी कसे, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.

 

Doctor Umesh Torne गेल्या १५ दिवसांपासून आम्ही पुरेसे अ‍ॅम्फोटेरेसिन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वाढीव किंमतीतही ते मिळत नाही. याचा उपचारांवरदेखील परिणाम होतो. ही गंभीर बाब आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे.
– डॉ. उमेश तोरणे, ईएनटी तज्ज्ञ

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -