घरमहाराष्ट्रनाशिकयोग अभ्यासक्रमाचा द्राविडी प्राणायम सुरूच

योग अभ्यासक्रमाचा द्राविडी प्राणायम सुरूच

Subscribe

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची कार्यवाही चार वर्षांपासून आराखड्याच्याच पातळीवर

मोठ्या भवतीन्भवतीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चार वर्षांपूर्वी योगाच्या पदवी अभ्यासक्रमाला मान्यता दिली. मात्र, हे काम अद्याप आराखड्याच्या पातळीवरच असल्याने या अभ्यासक्रमाचा द्राविडी प्राणायम चार वर्षानंतरही सुरूच असल्याचे स्पष्ट होते. या संदर्भात विद्यापीठाने दोन महाविद्यालयांचे प्रस्ताव सेंट्रल कौन्सिल ऑफ योगाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. यात नाशिक येथील योग विद्याधाम आणि लोणावळा येथील कैवल्यधाम यांचा समावेश आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत योग अभ्यासक्रम सुरू व्हावा, यादृष्टीने दहा वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू झाले होते. मृदुला फडके यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात या प्रयत्नांना जोर आला होता; परंतु कालांतराने अभ्यासक्रमाविषयीच्या संपूर्ण चर्चेला विराम मिळाला होता. त्यानंतर अभ्यासक्रमासाठीचे प्रयत्नच बंद झाल्याने या महत्त्वाकांक्षी निर्णयाची अंमलबजावणी होण्याच्या आधीच तो मागे पडला. डॉ. अरुण जामकर यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी योग अभ्यासक्रमाच्या मागणीला ‘बुस्ट’ दिला. आरोग्य, मन:शांती, व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता अशा सर्वांगीण उन्नतीसाठी बौद्धिक विकासासाठी योग आवश्यक असल्याचे त्यांचे ठाम मत असल्याने त्यांनी योग अभ्यासक्रमासाठी पाठपुरावा केला. या अनुषंगाने बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड योगिक सायन्स या पदवीस मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिक येथील योग विद्याधाम आणि लोणावळा येथील कैवल्यधाम यांनी योग अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्ताव दिले होते. या प्रस्तावाला विद्यापीठाने मान्यता देत त्यास सेंट्रल कौन्सिल ऑफ योगाकडे ते अंतिम मंजुरीसाठी पाठवले होते. त्यास मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठाचे काम कासवगतीने सुरू आहे. याविषयी कुलसचिव कालिदास चव्हाण म्हणाले, याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तर योग विद्याधामचे विश्वास मंडलीक यांनी सांगितले की, आमच्याकडे कालिदास विद्यापीठाचे तसेच आयुष विभागाचेही प्रस्ताव आहेत. आरोग्य विद्यापीठासाठीही आमची तयारी आहे. मात्र, अद्याप प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झालेली नाही.

योग विद्याधाम

डॉ. विश्वास मंडलिक यांनी सुरू केलेली योग विद्याधाम ही संस्था गेली ५० वर्षे योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे. या संस्थेच्या महाराष्ट्रासह भारतात ठिकठिकाणी तसेच परदेशातही शाखा आहेत.

- Advertisement -

कैवल्यधाम विद्यालय

लोणावळा (पुणे) येथे कैवल्यधाम हे जगातील सर्वात जुने, असे योग विद्यालय आहे. या विद्यालयात फक्त योग शिकवला जात नाही, तर तर प्रत्येक योग धारणेबद्दल आधुनिक संशोधन केले जाते. जगन्नाथ गणेश गुणे ऊर्फ स्वामी कुलवयानंद यांनी आपले गुरू परमहंस माधवदासजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होऊन ऑक्टोबर १९२४ रोजी कैवल्यधामची स्थापना केली. कैवल्यधाम योग केंद्र १८० एकर जागेत वसलेले आहे. “परंपरागत योगाची नवीन विज्ञानाशी सांगड घालणे’ हा कैवल्यधामचा मुख्य उद्देश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -