नाशिकरोडला मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब; राज्य सरकारचा हिरवा कंदील

अलिबागच्या धर्तीवर प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांकडून तात्विक मंजुरी, महासभेवर प्रस्ताव

Multi Model Transport Hub
प्रातिनिधीक फोटो

सिन्नर फाटा परिसरात प्रस्तावित असलेल्या शहर बस, महारेल व मेट्रो निओच्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबच्या प्रस्तावाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे. पीपीपी तत्वावर उभारल्या जाणार्‍या या प्रकल्पाचा प्रस्ताव येत्या महासभेवर मान्यतेसाठी सादर केला जाईल, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. अलिबाग-विरारच्या धर्तीवर नाशकात मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबची उभारणी प्रस्तावित आहे.

महापालिकेच्या माध्यमातून नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीमार्फत शहर बससेेवेचे संचालन केले जात आहे. बससेवेचा शुभारंभ होऊन आता चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या बससेवेकरीता उभारण्यात येणार्‍या नाशिकरोड विभागातील सिन्नरफाटा परिसरातील बसडेपोचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. प्रस्तावित भूखंड यापूर्वी रेल्वेला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सन २०१७ च्या विकास आराखड्यात या भूखंडावर पब्लिक मेनिटीसाठी आरक्षण पडल्याने महापालिकेने शहर बस डेपो उभारण्याचा निर्णय घेतला गेला. सुमारे दहा एकर जागेवर बस डेपो उभारण्याचे काम सुरु असतानाच प्रस्तवित जागेवरून नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग जात आहे. यासाठी महारेल कंपनीने महापालिकेकडे या जागेची मागणी केली आहे. परंतु डेपोचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने महापालिका आयुक्त जाधव यांनी या जागेवर मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हबचा प्रस्ताव महारेल कंपनीला दिला आहे.

मेट्रो निओ प्रकल्प देखील याच भागातून जाणार असल्याने नाशिककरांना एकाचं वेळी रेल्वे, शहर बस व टायरबेस मेट्रो एकाचं ईमारती मध्ये उपलब्ध करून देण्याच्या अनुशंगाने तीन मजली इमारत उभारून तेथे मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब निर्माण करण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात महारेल, मेट्रो निओ आणि महापालिका, शहर बस कंपनीच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत या प्रकल्पासाठी फिजिबिली रिपोर्ट अर्थात व्यवहार्यता तपासणी अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आयुक्त जाधव यांनी या प्रस्तावाविषयी माहिती सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील या प्रकल्पाविषयी सकारात्मक भूमिका घेत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून यासंदर्भातील प्रस्ताव आता महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

अलिबाग-विरारच्या धर्तीवर नाशकात मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबची उभारणी प्रस्तावित आहे. महापालिकेची शहर बससेवा, महारेल, व मेट्रो निओसाठी या ठिकाणी एकाच प्रकल्पात स्थानके उभारली जाणार आहेत. याशिवाय या ठिकाणी कमर्शियल मॉल, चार तारांकीत हॉटेल, रिक्रिएशन सेंटर व कार पार्कींगची सुविधाही असणार आहे.

या असतील सुविधा

हबमध्ये ट्विन टॉवर उभारण्यात येणार असून त्या ग्रीन बिल्डिंग असतील परिसरात जीम, शॉपिंग मॉलपासून थेट थेअरटरपर्यंत सुविधा असतील २० हजार चौरस फुटाचे बांधकाम प्रस्तावित पहिल्या मजल्यावर रेल्वे, दुसर्‍यावर बस तर तिसर्‍या मजल्यावर मेट्रो असेल पॅरा ट्रांझीट म्हणजेच रिक्षा, टॅक्सीसारखी अन्य प्रवासी साधनांचीदेखील उपलब्धता असेल इमारतीत कमर्शिअल मॉल, कार पार्किंगची सुविधा प्रतीक्षा कालावधीत वेळ घालवण्यासाठी थिएटर, मॉल, जीमची सुविधा