परमबीर सिंहांच्या नावावर सिन्नरमध्ये बेहिशेबी मालमत्ता?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने त्यांचे परिचित संजय पुनामिया यांनी सिन्नर तालुक्यात बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे, पुनामियाने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

पुनामिया यांनी सिन्नर तालुक्यात जमीन खरेदी करताना शेतकरी असल्याच्या पुराव्यांबाबत सिन्नर पोलीस व तहसीलदार कार्यालयात मुंबईच्या अग्रवालांनी २०१७ मध्ये तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनी फिर्यादी आणि पुनामियांमधील वाद मिटल्याने तक्रार रद्द झाली होती. मात्र, आता रजिस्टरने पुन्हा सिन्नर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. पुनामिया हे बनावट शेतकरी असून, त्यांनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमिनी खरेदी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार सिन्नर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पुनामियांच्या उत्तन (ठाणे) येथील खरेदीखतांची सत्यता पडताळणी केली असता, त्यात एका जमीन खरेदीत बाबुलाल अग्रवालांचे सातबारे उतारे जोडल्याचे दिसून आले. तर दुसर्‍या जमीन खरेदीत सातबारा उतार्‍याच्या मालकांचा तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी घेतला असता त्याचे मालकही पुनामिया नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातून पुुनामिया यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी खरेदी केल्याचे समोर आले आहे.

संजय पुनामिया यांनी सिन्नर तालुक्यातील मौजे धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करताना पुनामिया यांनी शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून दोन सातबारे जोडले आहेत. शिवाय, त्याआधारे सिन्नरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात त्याचे खरेदीखत तयार केले गेले आहे. ही जमीन पुनामिया व त्यांचा मुलगा सनी या दोघांच्या नावे असून, पुनामियांच्या नावे परमबीर सिंह यांनीच जमीन खरेदी केली असावी, अशी चर्चा सुरू आहे. माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एका खंडणीच्या गुन्ह्यातील सहआरोपी आहेत.

दरम्यान, पुनामिया तुरुंगात असल्याने त्यांच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. चौकशीतूनच सर्वकाही समोर येईल. असे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, सचिन पाटील यांनी सांगितले आहे.