कुंभारवाडा परिसराची आयुक्तांकडून पाहणी

जुने नाशिक परिसरातील कुंभारवाडा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसराची शनिवारी (दि.१६) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगरसेवकांसमवेत पाहणी केली. त्यांनी पाहणी करत अधिकार्‍यांना उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक तथा गटनेते गजानन शेलार, नगरसेविका वत्सला खैरे,वैशाली भोसले उपस्थित होते.

आयुक्त गमे यांनी पाहणीदरम्यान परिसरात तातडीने औषध फवारणी करून घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. तसेच त्यांनी या परिसरातील शौचालयाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. या ठिकाणी असणार्‍या एका इमारतीचा सिहस्थ कुंभमेळा काळात वापर करण्यात आला होता. त्या इमारतीत वैद्यकीय सेवा सुरू करता येईल का, या दृष्टीने आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना पाहणी करण्याच्या दृष्टीने सूचना देणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त गमे यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. परिसरातील पाहणीच्या वेळी परिसरातील रंगारवाडा येथील रुग्णालयास भेट दिली. रुग्णालय मनपा शाळा क्रमांक ३६ मध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या शाळेत रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागास नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त गमे यांनी दिल्या. नाशिक शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे , जेणेकरून रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे आवाहन आयुक्त गमे यांनी केले.

यावेळी आयुक्त गमे यांनी नगरसेवक गजानन शेलार, नगरसेविका वत्सला खैरे, वैशाली भोसले यांच्याशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, डॉ. अजिता साळुंके, उपअभियंता एस. ई. बच्छाव, डॉ.विनोद पावसकर, स्वच्छता निरीक्षक पी. डी. पाटील आदी उपस्थित होते.