घरमहाराष्ट्रनाशिकरामसेतू पुलाच्या मुद्द्यावर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी आमनेसामने

रामसेतू पुलाच्या मुद्द्यावर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी आमनेसामने

Subscribe

नाशिक : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे रामसेतू पुलाला मोठे तडे पडल्याने महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने हा पूल बंद केला आहे. पूल स्मार्ट सिटीकडे हस्तांतरित केला असतानाही महापालिकेचा हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या प्रश्नावरुन महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे.

आठवडाभरापासून नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने तेथून नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गोदापात्रातील नदी पाण्याची पातळीत वाढ झाली आणि अनेक लहान मोठे पूल व मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. गोदावरीला आलेला पूर मोजण्यासाठी दोन मापक शहरवासियांनी ठरवले आहे ते म्हणजे दुतोंड्या मारुती आणि रामसेतू पूल पाण्यात होते. गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सोमवारपासून (दि. ११) रामसेतू पूल दोन दिवस हा पूल पाण्याखाली गेला होता. पावसाचा जोर आणि पुराचे पाणी कमी झाल्यानंतर रामसेतू पुलाचे काही कठडे वाहून गेलेले दिसले. तर, अनेक ठिकाणी पुलाला मोठमोठे खड्डे पडलेले असल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून शुक्रवारी (दि.१५) महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने रामसेतू पूल हा पादचारी आणि वाहनांच्या वापरासाठी बंद केला. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेड्ल लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

गेल्यावर्षी आपलं महानगरने या पुलाच्या दूरावस्थेची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी प्रशासनाने बातमीची दखल घेतली असती आणि पुलाची डागडुजी केली असती तर हा पूल सुस्थितीत राहिला असता. मात्र, प्रशासनाच्या वेळकाढू भूमिकेमुळे पूलाची स्थिती आणखी खराब झाली. काही महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी कंपनीकडून रामसेतू पूल पाडला जाणार असल्याचे समजताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध करत पूल दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत मार्च महिन्यात स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रामसेतू पुलाचा पाहणी दौरा केला होता. परंतु, पाहणीला तीन महिने उलटूनही कोणत्याही यंत्रणेकडून योग्य ते पाऊल उचलले गेले नाही. प्रशासनाकडून रामसेतू पूल पादचारी आणि वाहनांसाठी वापरण्यास बंद केलेला असला तरीही, पूराचे पाणी पाहण्यासाठी, तसेच सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी याच पुलावर मोठी गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -