रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर महापालिकाच विकसित करणार फाळके स्मारक

स्मारक दोन दिवसांत खुले होणार; तात्पुरती दुरूस्तीची कामे पूर्ण

नाशिक : खासगीकरणाचा प्रयोग फसल्यानंतर आता हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर स्वनिधीतून फाळके स्मारकाच्या पुनर्विकासाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सल्लागार नियुक्ती आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी ठेकेदार नियुक्ती प्रक्रियेला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यादरम्यान शाळांची उन्हाळ्याची सुटी संपणार असल्याने तात्पुरती दुरूस्तीची कामे पूर्ण करून फाळके स्मारक येत्या दोन दिवसात नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी घेतला आहे.

महापालिकेने १९९९मध्ये पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली होती. सुरुवातीला महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे साधन बनलेल्या या प्रकल्पाची कालांतराने दूरवस्था होवून प्रकल्प तोट्यात गेला. या प्रकल्पाच्या देखभाल-दुरूस्तीवर आजवर साडेदहा कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र त्यानंतरही या प्रकल्पाची दैना कायम राहिल्याने पीपीपी तत्वावर अर्थात खासगीकरणातून या प्रकल्पाचा पुनर्विकास साधण्याची योजना तत्कालिन आयुक्त कैलास जाधव यांनी आणली होती.

यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत या खासगीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवित महापालिकेच्या माध्यमातूनच हा प्रकल्प विकसित करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे खासगीकरणाची निविदा प्रक्रिया रद्द करत स्वनिधीतून हा प्रकल्प विकसित करण्याचे तसेच नागरिकांसाठी सत्वर प्रकल्प खुला करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार या प्रकल्पातील किरकोळ दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्मारकातील बहुचर्चित कृत्रिम धबधबा आणि कारंजे सुरू करण्यात आले आहे. आयुक्त पवार हे स्मारकाची पाहणी करणार असून दोन दिवसात हा प्रकल्प नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात खुला केला जाईल, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली.

प्रकल्प सल्लागार नेमणार

हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर या प्रकल्पाचा विकास साधण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून येत्या एक-दोन दिवसात यासाठी स्वारस्य देकार मागविले जाणार आहेत.

वॉटर पार्क पीपीपी विकसित करणार

फाळके स्मारक स्वनिधीतूनच विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी या प्रकल्पा लगत असलेल्या वॉटर पार्कचा विकास मात्र पीपीपी तत्वावर केला जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा जारी केल्या जाणार असून दहा वर्षे मुदतीकरीता हा ठेका दिला जाणार आहे.