भयंकर! …म्हणून दारुच्या पार्टीतच मित्राचा केला खून

फरार हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात

औताळे (ता. दिंडोरी) शिवारात २४ जून रोजी झालेल्या २२ वर्षीय युवकाचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात वणी पोलिसांना यश आले आहे. दारुच्या पार्टीत बायकोबद्दल अपशब्द बोलल्याचा रागातून एकाने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खूनाच्या घटनेनंतर २४ दिवसांपासून फरार झालेल्या मित्रास नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरात सीमजवळून सापळा रचून अटक केली.

औताळे (ता. दिंडोरी) येथील जगदीश संजय भोये यास दारु पिण्याची सवय होती. तो व त्याचा मित्र विष्णू वाळू बागूल आणि आणखी एक मित्र असे तिघेजण एकत्र दारु पीत असायचे. विष्णू बागूल हा जगदीश यास कामासाठी बोलावून आपल्या बरोबर कामास घेऊन जात असायचा. 24 जून 2021 रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान जगदीश हा विष्णू बागूलसोबत गणेश शंकर गावीत यांच्या मळयात कामासाठी गेला होता. संध्याकाळी दोघे परत आले. जगदीश घरी थांबलेला होता. त्याचदिवशी रात्री ८ वाजेदरम्यान जगदीश घराबाहेर गेला तो परत आलाच नाही.

२६ जून रोजी जगदीशचा भाऊ संदीप संजय भोये याने त्याचा शोध घेतला. तरीही तो कोठेही आढळून आला नाही. दुसर्‍या दिवशी संदीप पडीत असलेल्या काचवाल्याचे घराजवळील औताळे शिवारात मुले जावुन बसतात तेथे पाहण्यास गेला. त्या ठिकाणी त्याला जगदीश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. संदीपने जवळ जाऊन बघितले असता जगदीश मृतावस्थेत दिसला. ही बाब वणी पोलिसांना समजली. याप्रकरणी जगदीशची आई मंगल भोये यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पोलिसांनी जगदीशचा डोक्यात दगड किंवा हत्याराने वर्मी घाव केल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.

खूनाच्या गुन्ह्यात पोलिसांना कोणतेही पुरावे मिळत नव्हते. दरम्यान, पोलीस आजूबाजूच्या गावात चौकशी असताना खूनाचा उलगडा झाला. जगदीशचा मित्र विष्णू बागूल हा खूनाच्या घटनेपासून फरार असल्याचे समोर आले. पोलिसांच्या त्याच्यावर संशय बळावला. तो १७ जुलै रोजी गुजरातमधील एका खेडेगावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि.१८) सापळा रचून त्यास अटक केली. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.