दारुसाठी पैसे न दिल्याने युवकाचा खून

हरसूल येथील घटना, तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Murder

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उंबरपाडा येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून टोळक्याने एका युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी संशयित तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिदास गंगाराम मौले (वय ५१, रा.उंबरपाडा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नावे आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दारु पिण्यासाठी पैसे मागितल्याने हरिदास मौले आणि राऊत नावाच्या व्यक्तीमध्ये सुरुवातीला वाद झाला. या वादात दोन तरुण मध्यस्थी झाले. तिघांनी संगनमताने मौले यांना मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हरसूल पोलिसांनी जखमी अवस्थेत मौले याचा जबाब घेतला होता. त्यावेळी दारुसाठी पैसे न दिल्याने तिघांनी बेदम मारहाण केल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करत आहेत.