घरमहाराष्ट्रनाशिकपितर घालण्याच्या वादातून पाचव्या पत्नीचा खून

पितर घालण्याच्या वादातून पाचव्या पत्नीचा खून

Subscribe

अपघाती मृत्यूचा बनाव करणार्‍या ७० वर्षीय पतीला अटक; विंचूर दळवी येथील घटना

वाडवडिलांच्या पितरासाठी ७० वर्षीय पतीने आपल्या वयोवृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत जीवेठार मारल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.२३) सकाळी विंचूर दळवी (ता. सिन्नर) येथे घडली. खूनानंतर पत्नीचा मृतदेह रस्त्यावर टाकून पतीने अपघाती मृत्यूचा बनाव उघडकीस आल्याने पोलिसांनी पतीला अटक केली आहे. दरम्यान, घरात किराणा माल खरेदीसाठी पैसे नाहीत. पितराच्या कारणावरुन वडिलांनी मारण्याची धमकी दिल्याचे घटनेच्या आदल्याच दिवशी महिलेने आपल्या मुलाला सांगितले होते.  हिराबाई नामदेव भोर (५८) खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, नामदेव राजाराम भोर (७०) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. हिराबाई ही नामदेव यांची पाचवी पत्नी होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी नामदेव भोर यांची पाच लग्न झालेली आहेत. नामदेव भोर संशयी वृत्तीचे असल्याने ते पत्नीवर नेहमी संशय घेत शिवीगाळ व मारहाण करायचे. मध्यस्थी करणार्‍या मुलासही ते शिवीगाळ व मारहाण करायचे. भोर यांना सकाळी ७ वाजता जेवणाची सवय होती. सकाळी जेवण दिले नाही तर ते पत्नीला बेदम मारहाण करायचे. त्यामुळे हिराबाई भोर पतीच्या स्वभावाला कंटाळलेल्या होत्या. वडिलांच्या संशयी वृत्तीमुळे मुलगा समाधान याचाही विवाह जमत नव्हता. सावत्र आई सुल्याबाई नामदेव भोर यांचा सिन्नर न्यायालयात खावटीचा दावा दाखल आहे. त्यांना नियमित खावटीची रक्कम न मिळाल्याने वडील नामदेव भोर यांना वेळोवेळी न्यायालयाने वारंट येत असतात. पैसे असतानाही वडील खावटीचे पैसे भरत नसल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

समाधान भोर यांना वणी (ता. दिंडोरी) येथे टाईल फरशीचे काम मिळाल्याने ते कामावर हजर झाले होते. रविवारी (दि.२२) दुपारी २.३० वाजता आई हिराबाई यांनी समाधान भोर यांच्याशी मोबाईलव्दारे संपर्क साधला. सोमवारी (दि.२३) वाडवडिलांचे पितर आहेत. घरात किराणा आणण्यासाठी पैसे नाहीत. पितरासाठी किराणा माल आणला नाही आणि पितर घातले नाही तर वडिलांनी मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे हिराबाईंनी मुलाला सांगितले. मात्र, कामाचा व्याप असल्याने पितरांना येण्यास जमणार नसल्याचे मुलाने आईला सांगितले होते. दरम्यान, सोमवारी (दि.२३) सकाळी ६.४५ वाजता समाधानच्या एका मित्राने फोनद्वारे हिराबाईंचा मृतदेह घरासमोर पडला असून, नामदेव भोर हे रस्त्यावर येरझार्‍या घालत असल्याचे सांगितले. ही घटना ऐकताच समाधान तातडीने घटनास्थळी आला. त्यानंतर त्याने थेट पोलिसांत धाव घेत वडिलांविरुद्ध तक्रार दिली. वडिलांनीच आईला बेदम मारहाण करत मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -