आनंदवलीतील तीन फ्लॅटची परस्पर विक्री; शैलेश कुटेंसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल दाखल

नाशिक : कोणतेही अधिकार नसताना तीन फ्लॅटची परस्पर विक्री केल्याचे भासवून त्यात भाडेकरू ठेवून दोन जणांनी फ्लॅटमालकास कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रदीप किसन खंडागळे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित प्रमोद वसंत कुटे व शैलेश श्रीहरी कुटे या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड, पुणे येथील प्रदीप किसन खंडागळे यांचे आनंदवली शिवारात युनिक वास्तू इमारतीत तीन फ्लॅट आहेत. २२ फेब्रुवारी ते १८ जुलै २०१६ या कालावधीत संशयित प्रमोद कुटे याने कोणतेही अधिकार नसताना किंवा संचालक मंडळाचा कोणताही ठराव झालेला नसताना बेकायदेशीररित्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तीनही फ्लॅट संशयित शैलेश कुटे व निर्मला कुटे यांना विक्री केल्याचे भासवले. १०० रुपयांच्या बनावट करारनाम्याच्या आधारे संशयित शैलेश कुटे यांनी खंडागळे यांच्या ताब्यातील फ्लॅटची कुलूप तोडून अनधिकृतपणे त्यात प्रवेश करून कट रचून फ्लॅटमध्ये भाडेकरी टाकून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर खंडागळे यांनी गंगापूर पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर करत आहेत.

कोण आहेत शैलेश कुटे 

शैलेश कुटे हे शिर्डी साईबाबा मंडळाचे विश्वस्त होते आणि त्यांनी सलग आठ वर्षे या पदावर होते. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या कुटे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी वायक्तिक संबंध आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेश सचिव ही पदे भूषवली आहेत. त्याच सोबत सहकरतही त्यांनी काही पदे उपभोगली आहेत. काही वर्षापासून राजकीय जीवनातून बाजूला होत त्यांनी स्वताला व्यवसायात स्थिरावले आहे. शहराच्या केंद्रभागी असलेल. एसएसके सॉलीटेअर या हॉटेलचे ते मालक आहेत.