घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र निवडणूक : चांदवडला चौघांमध्ये रस्सीखेच

मविप्र निवडणूक : चांदवडला चौघांमध्ये रस्सीखेच

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. चांदवड तालुक्यातील चार मातब्बर इच्छुक मैदानात उतरले आहेत. यात दोन डॉक्टरांसह दोन माजी आमदारांनी उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच प्रचाराची गुढी उभारल्याने उमेदवारीचा मोठा पेच निर्माण होणार आहे. यापैकी ऐनवेळी उमेदवारी कुणाला मिळते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

चांदवड तालुक्यात एकूण 684 मतदार आहेत. तर, विरोधी गटाचे प्रमुख अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचा हा तालुका असल्यामुळे येथील सदस्यांना व उमेदवारांना विशेष महत्व प्राप्त होते. अशा परिस्थितीत 2017 च्या निवडणुकीत नीलिमा पवार यांच्या पॅनलचे उमेदवार माजी आमदार उत्तमबाबा भालेराव हे विजयी झाले. त्यांना 4 हजार 881 मते मिळाली. तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले डॉ. सयाजी गायकवाड यांना 4 हजार 414 मते मिळूनही त्यांचा 467 मतांनी पराभव झाला. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी यंदा त्यांनी सहा महिन्यांपासून प्रचार सुरू केला आहे. त्यांना अ‍ॅड. ठाकरे गटाकडून तालुका संचालकपदासाठी उमेदवारी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. तर त्यांच्या विरोधात उतरण्यासाठी विद्यमान संचालक उत्तमबाबा भालेराव हे इच्छुक आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादीशी कनेक्ट असलेला उमेदवार पॅनलमध्ये हवा म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो. पण त्यांच्यावरील राष्ट्रवादीचा शिक्का आता पुसट झाल्याचेही बोलले जाते. त्यामुळे डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचाही सक्षम पर्याय सत्ताधारी गटाकडे आहे. बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेत भाजपचे गटनेते म्हणून त्यांनी सक्षमपणे किल्ला लढवला. ही राजकीय पार्श्वभूमी आणि पॅनलमध्ये हुशार व्यक्तींचा समावेश असावा, यादृष्टीने त्यांचाही विचार प्रामुख्याने होऊ शकतो. तसेच, 2012 च्या निवडणुकीत नीलिमा पवार यांच्या गटाकडून संचालक झालेले माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल हेदेखील सक्रिय झाले आहेत. त्यांनाही उमेदवारी मिळण्याची अपेक्षा लागून असल्यामुळे ते पुन्हा प्रचाराला भिडले आहेत. सत्ताधारी किंवा विरोधी गटातून आपल्याला संधी मिळावी म्हणून त्यांनी प्रचार चालवलेला दिसतो. एकंदरीत, विद्यमान संचालक उत्तमबाबा भालेराव यांना पॅनलकडून पुन्हा संधी मिळते की डॉ. आत्माराम कुंभार्डे, शिरीषकुमार कोतवाल यांना उमेदवारीची संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -