मविप्र निवडणूक : संस्थेच्या प्रचारासाठी कर्मचार्‍यांवर दबाव ?

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना सत्ताधार्‍यांकडून सेवक, कर्मचार्‍यांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यात येत असल्याचा आरोप संस्थेचे माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केली आहे.

यासंदर्भात अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले की,

निवडणूक जाहीर झालेली नसताना सत्ताधारी प्रामुख्याने सरचिटणीस व त्यांचे कुंटुंबिय संस्थेचा गैरवापर करत असून, सेवकांना मतदारांच्या घरी प्रचारासाठी पाठवत असल्याचे निर्देशनास येत आहे. याची पदाधिकार्‍यांकडे तक्रार केली; मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. आम्हाला प्रचारासाठी बळजबरीने पाठविले जात असल्याच्या लेखी तक्रारी अनेक कर्मचारी, सेवक यांनी केल्या आहेत. प्रचार न केल्यास कारवाई केली जाईल, अशा धमक्या दिल्या जात आहेत. तसेच कर्मचारी व सेवकांना सभासद नातेवाईकांकडे पाठवून आम्हालाच मतदान करा असा आग्रह केला जात आहे. नातेवाईक सभासदांची मते न मिळाल्यास बदली केली जाईल अशी धमकी आम्हाला शिक्षणाधिकार्‍यांकडून दिली जात असल्याचे कर्मचार्‍यांचे पत्र असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. शिक्षणाधिकार्‍यांने कर्मचार्‍यांना अर्वाच्च भाषेत दम दिल्याचा व्हीडीओ देखील प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचार्‍यांनी आमचे नाव सांगू नका मात्र, आम्हाला या त्रासातून वाचवा अशी मागणी पत्रात केल्याचे अ‍ॅड.ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरचिटणीस नीलिमा पवार म्हणतात की,

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा कारभार हा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागात असल्याने तेथील विद्यार्थ्यांना चांगल्या सोई-सुविधांयुक्त इमारती उपलब्ध करून देणे हे संस्थेचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील संस्था संचालक प्रतिनिधींच्या व तालुक्यातील सभासदांच्या विनंतीनुसार तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीकोनातून बांधकामे केली आहेत. या इमारती विद्यार्थ्यांना खुल्या करण्यासाठी त्यांचेे उद्घाटन केले जात आहे. तसेच संस्थेसाठी मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे तेथील शाळा इमारतींना देण्याची मागणी सभासदांनी केली आहे. कार्यक्रमास संस्थेचे सभासद, हितचिंतक व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देणे आवश्यक आहे. सभासद व इतर हितचिंतकांना त्यांची व्यवस्था बघणे तसेच आपल्या शाळेच्या कार्यक्रमासाठी लोकांना बोलावणे ही शाळेतील कर्मचार्‍यांची नैतिक जबाबदारी आहे. यात निवडणूक प्रचाराचा कुठलाही मुद्दा असण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले.