घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र निवडणूक : परिवर्तन पॅनलच्या मेळाव्यात घोषणांचा पाऊस

मविप्र निवडणूक : परिवर्तन पॅनलच्या मेळाव्यात घोषणांचा पाऊस

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे वार्षिक बजेट 800 कोटींवर पोहोचवल्याचा प्रचार सत्ताधारी करत असले तरी त्यातील 80 टक्के रक्कम ही कर्मचार्‍यांच्या पगाराचीच आहे. त्यातही संस्थेवर 200 कोटींचे कर्ज करुन ठेवले आहे. इमारतींच्या अनावश्यक बांधकामातून कर्जाचा डोंगर उभा राहत असल्याची घणाघाती टीका परिवर्तन पॅनलचे प्रणेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केली.

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलच्या संभाव्य उमेदवारांनी मंगळवारी (दि.9) जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज सादर केले. यानंतर धनदाई लॉन्स येथे अरविंद कारे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी संचालक अंबादास बनकर, राजेंद्र डोखळे, सुरेश डोखळे, रवींद्र देवरे, प्रवीण जाधव, संदीप गुळवे, नानासाहेब दाते, भगिरथ शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. ठाकरे म्हणाले की, मविप्र समाज शिक्षण संस्था ही एका कुटुंबापर्यंत मर्यादीत राहायला नको. ही समाजाची संस्था असल्यामुळे सर्वांना मत मांडण्याचा अधिकार मिळायला हवा. पण सत्ताधारी गटाकडून जाणीवपूर्वक निफाडच्या अस्मितेविषयी प्रश्न उपस्थित केले जातात.

- Advertisement -

चांदवड आणि निफाडच्या मतदारांमध्ये संभ्रम तयार करुन मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न यावेळी असफल ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रयत शिक्षण संस्थेप्रमाणे पारदर्शक कारभार करण्यासाठी परिवर्तन घडवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार कोकाटे म्हणाले, शिक्षण संस्थेच्या प्रगतीबाबत सत्ताधारी गटाने राज्य सरकारकडे कुठलाही पाठपुरावा केला नाही. माजी मंत्री छगन भुजबळ हे विरोध करत असल्याचे सांगत असले तरी आम्ही आमदार आहोत. सभासद या नात्याने आम्ही संस्थेच्या विकासासाठी मदत केली असती पण सत्ताधार्‍यांनी आपल्याकडे एकही पत्र न दिल्याचे आ. कोकाटेंनी सांगितले. यावेळी बाळासाहेब क्षीरसागर, संदीप गुळवे, राजेंद्र डोखळे, जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे, प्रा. हरिश आडके, शिरीषकुमार कोतवाल, नानासाहेब दाते, विजय पगार, सुनील पाटील, गजेंद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते.

मेळाव्यातील ठळक मुद्दे

  • मविप्र संस्थेत परिवर्तन पॅनल सत्तेत आला तर मेडिकल कॉलेजमध्ये 50 टक्के सवलतीत औषधे देणार
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले तर मविप्र संस्थेला 25 कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देणार
  • संपूर्ण जिल्ह्यात तालुकास्तरावर वैद्यकीय सुविधा केंद्र उभारणार सरचिटणीसपदासाठी अ‍ॅड. नितीन ठाकरे, सभापतीपदासाठी बाळासाहेब क्षीरसागर यांची नावे निश्चित
  • गावकीच्या राजकारणात सत्ताधारी गटाचा हस्तक्षेप
  • माणिकराव बोरस्तेंना मतदानाची साधी तारीखही बदलता आलेली नाही
  • केदा आहेरांना फक्त राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायची राहिल्याचा टोला
  • ढाब्यावर जेवायला बसलो तरी 10 ते 12 हजार रुपये बिल होते इतके कमी वेतन विनाअनुदानित शाळेतील कर्मचार्‍यांना वेतन मिळते
  • नवीन सभासदांना माझा विरोध हा चुकीचा आरोप
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -