घरमहाराष्ट्रनाशिकमाविप्र निवडणूक : सत्ताधारी विरोधक आमने-सामने

माविप्र निवडणूक : सत्ताधारी विरोधक आमने-सामने

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी नवीन सभासद यादीत मनमानी पध्दतीने नावे घुसवून मर्जितील व्यक्तिंना सभासदत्व बहाल केल्याचा आरोप संस्थेचे माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला आहे. धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे मयत सदस्य व त्यांच्या वारसाने झालेले सदस्यांची यादी दिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

अ‍ॅड. ठाकरे म्हणाले की, संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीने नवीन वारसा सभासद करताना फक्त पवार कुटुंबियांशी निगडीत व्यक्तींनाच सदस्यत्व बहाल केले. त्यावर अनेकांनी हरकती नोंदविलेल्या आहेत. वारसा सभासदत्व देतांना कार्यकारिणीने चुकीचे अटी, नियम लादले आहेत. खोटी संमती पत्रे, मृत्यूपत्र याचा आधार घेऊन सोईने सभासदत्व केले आहे. मयत सभासद कोण अन त्यांचे वारस नेमके कोण याचा कोणताही उलगडा होत नाही. त्यामुळे या यादीत कार्यकारिणीने मनमानी पध्दतीने नावे घुसवून घोळ केलेला असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मवीरांच्या कुटुंबियांना सभासदत्व देण्यास विरोध नाही. मात्र, हे सभासदत्व देतांना सर्वांना समान न्याय देणे आवश्यक आहे. एकाबाजूला काकासाहेब वाघ यांच्या वारसांना सभासदत्व दिले जात असताना दुसरीकडे स्व. भाऊसाहेब हिरे यांच्या नातवांनी सभासदत्वासाठी अर्ज करून देखील त्यांनी सभासदत्व नाकारले जाते, हा मोठा अन्याय आहे. या यादीत घोळ असल्याने मयत सभासद व त्यांचे केलेले वारसा याची माहिती मागविली होती. न्यायालयाने अशी माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते; मात्र, केवळ नवीन वारसा सभासद यादी मला देण्यात आली आहे. नवीन वारसा सभासद यादीला विरोध नाही. मात्र, चुकीच्या पध्दतीने नावे घुसवून सभासदत्व देण्याला विरोध आहे. सभासदांमध्ये जागृती व्हावी यासाठी यादीचा हट्ट करत असल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले. यावेळी डॉ. सयाजी गायकवाड, प्रा. अशोक पिंगळे उपस्थित होते.

- Advertisement -

कर्मचार्‍यांचा प्रचारासाठी वापर

शैक्षणिक कारणास्तव संस्थेच्या सेवकांना इतर निवडणुका लढवण्यास बंदी घातली जाते. मात्र, याच सेवकांचा संस्थेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी वापर करत असल्याचा आरोप अ‍ॅड.ठाकरे यांनी केला. सायखेडा येथे कर्मचार्‍यांचा मेळावे घेऊन कर्मचार्‍यांना थेट धमक्या दिल्या जात आहे. आपण चांगले काम केले आहे तर, सभासदांसमोर खुल्यामनाने जा. सेवकांना सभासदांचे मन वळविण्याची जबाबदारी का सोपविता असा सवाल डॉ. सयाजी गायकवाड यांनी उपअस्थित करत सेवक सत्ताधार्‍यांच्या दहशतीखाली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

- Advertisement -

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सदस्यत्व कुणाला द्यायचे आणि कुणाचे नाकारायचे याचे सर्वाधिकार हे कार्यकारिणीला असल्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे प्रत्युत्तर सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिले आहे. त्याआधारे मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या उभारणीत योगदान देणार्‍या कर्मवीरांच्या वारसांना सदस्यत्व बहाल केल्याचेही त्यांनी सांगितले.

मविप्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार यादींवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सरचिटणीस पवार म्हणाल्या, विरोधकांकडे आरोप करण्यासाठी कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते विरोधाला विरोध करत आहेत. धर्मदाय आयुक्तांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व सभासदांची यादी आम्ही त्यांच्याकडे सुपुर्द केली आहे. तसेच संस्थेच्या उभारणीत योगदान देणारे काकासाहेब वाघ यांचे वारसदार म्हणून अजिंक्य वाघ, समीर वाघ व शीला हापसे यांना सदस्यत्व दिले आहे. त्याचप्रमाणे भाऊसाहेब हिरे यांचे वारसदार म्हणून माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे व अद्वय हिरे यांना सदस्य न करता पुढच्या पिढीला सदस्यत्व देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामागील कारण म्हणजे 2012 च्या निवडणुकीत मालेगाव येथील महाविद्यालयात निवडणुकीचे केंद्र असताना त्यांनी अध्यक्षांना एका रुममध्ये कोंडून ठेवले होते. तेव्हा कार्यकारिणीने निर्णय घेतला की यांना सदस्यत्व बहाल करण्यात येऊ नये म्हणून त्यांचा अर्ज संस्थेकडे आजही प्रलंबित आहे. यानंतर संस्थेने मालेगाव येथे स्वत:चे महाविद्यालय उभारले आहे. मात्र, कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे योगदान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या नवीन पिढीला आम्ही निश्चितपणे सदस्यत्व बहाल करु, असेही त्यांनी सांगितले. विरोधकांचे मतदार यादिविषयी प्रश्न उपस्थित करुन सभासदांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधाला विरोध करणे ही त्यांची परंपरा राहिली आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

संभाजी राजेंनी सदस्यत्व देणार

राजर्षी शाहू महाराज यांचे मविप्र संस्थेच्या स्थापनेत बहुमूल्य योगदान राहिले आहे. यामुळे त्यांचे वारसदार म्हणून संभाजी राजे छत्रपती यांनी मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सदस्यत्वाची मागणी केल्यास आम्ही त्यांना ते तातडीने बहाल करु. हा संस्थेच्या दृष्टीने बहुमान असेल, असेही सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले.

बैठक नियोजनासाठी..

तामसवाडी येथील शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनाच्या नियोजनासाठी कर्मचार्‍यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी शैक्षणिक विषयावर चर्चा झाली.विरोधकांकडून प्रचारार्थ बैठक घेतल्याचे चित्र रंगविले जात आहे, हे खेदजनक असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ.एस. के. शिंदे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -