मविप्र; संधी मिळेल त्या पदासाठी निवडणूक लढवणार : डॉ.तुषार शेवाळे

शेवाळे यांचा अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर दावा; एकनिष्ठ राहण्याचा निर्धार

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरुन आता घमासान सुरू झाले आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांना संधी मिळते की नवीन उमेदवार दिला जातो, याविषयी तर्कवितर्क लागले जात आहेत. दरम्यान, अध्यक्षपदी उत्कृष्टपणे काम केल्याचे सभासद सांगत आहेत. त्यामुळे अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपदासाठी पॅनलप्रमुखांकडे दावा राहणार असल्याचे डॉ.तुषार शेवाळे यांनी म्हटले आहे.

सत्ताधारी पॅनलसोबत पाच वर्षे काम केले. या काळात कोरोनासारखी महामारी आली. या काळात सभासद असतील किंवा जिल्ह्यातील इतर समाजबांधव यांना मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा दिली. वैद्यकीय सेवेविषयी मला माहिती असल्यामुळे या सेवेचे महत्व ज्ञात आहे. त्यादृष्टीने सर्व समाजाची सेवा केली. पाच वर्षांच्या कार्यकाळात संस्थेच्या माध्यमातून सभासदांची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मला हे काम करता आले. सभासद असतील किंवा इतर रुग्णांचे आशीर्वाद मिळाले. त्यांच्या शुभेच्छांमुळेच आताही निवडणुकीची तयारी करत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन पदांसाठी माझी दावेदारी राहील, असेही डॉ. शेवाळे म्हणाले. पण काही कारणास्तव पॅनल प्रमुखांनी उमेदवारी नाकारली तर विरोधात जाण्याचा प्रश्नच नाही. सत्ताधारी पॅनलसोबत मी एकनिष्ठ आहे आणि राहील, अशी ग्वाही यानिमित्ताने तुम्हाला देतो, असेही डॉ.शेवाळे यांनी सांगितले. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळू शकते, असेही दिसते. त्यांच्याविरोधात विरोधी गटाकडून कुठला उमेदवार दिला जातो, याकडे जिल्ह्यातील सर्व सभासदांचे लक्ष लागून आहे.