‘नाफेड’ 900 रु. दराने कांदा खरेदी करणार

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्षांची माहिती

कांदा

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘नाफेड’ ही संस्था गुजरात व महाराष्ट्रातून 900 रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.
शेतकर्‍यांना विक्रीचा पर्याय मिळावा, देशात कांदा विक्रीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून ‘नाफेड’तर्फे दरवर्षी कांदा खरेदी केला जातो. करोनामुळे यंदा कांदा उत्पादकांना दराची चिंता वाटत होती. मात्र, आता नाफेडने गुजरात व महाराष्ट्रातून कांदा खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. शेतकर्‍यांना किमान 900 रुपये दर निश्चितपणे मिळणार आहे. व्यापार्‍यांना त्यापेक्षा कमी दराने खरेदी करता येणार नाही. जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन संघटनेचे राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी केली आहे. दरम्यान, ‘नाफेड’ने गेल्या वर्षी गुजरात व महाराष्ट्रातून 57 हजार क्विंटल कांदा खरेदी केला होता. चालू वर्षी त्याच प्रमाणात कांदा खरेदी केल्यास उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.