घरमहाराष्ट्रनाशिकचालत्या स्कूल व्हॅनने घेतला पेट; व्हॅन आगीत जळून खाक

चालत्या स्कूल व्हॅनने घेतला पेट; व्हॅन आगीत जळून खाक

Subscribe

विद्यार्थ्यांसह वाहनचालक, शिक्षिका सुखरूप

नाशिक : टी. बी. सेनेटरियमसमोरील मार्गावर मंगळवारी (दि.२५) दुपारी पावणेतीनच्या सुमारास स्कूल व्हॅनला अचानक आग लागली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत स्कूल व्हॅन जळून खाक झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील अशोक संपत नवले यांची एमएच १५ जीव्ही ७६६७ या वाहनात शालेय विद्यार्थी वाहतुकीचे काम करतात.

त्र्यंबकरोडवरील एक्स्पेलियर हेरिटेज स्कूल येथील इयत्ता तिसरी व चौथीत शिकत असलेल्या मुलांची ते वाहतूक करतात. मंगळवारी (दि.२५ ) नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर मुलांना सोडण्याचे काम सुरू होते, दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ओमकार बंगल्याकडून जात असताना अचानक गाडीच्या पुढच्या भागातून धूर येऊ लागला आणि बघता बघता गाडीने पेट घेतला.

- Advertisement -

त्यावेळी प्रसंगावधान दाखवत वाहन चालक नवले व सोबत असलेल्या महिला केअर टेकर यांनी चार ते पाच मुलांना तात्काळ उतरवत रस्त्याच्या कडेला नेऊन उभे केले. यावेळी एका जागरूक नागरिकाने तात्काळ पोलीस कंट्रोलला घटना कळविली असता म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांनी घटनास्थळी आले. अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आग विझवली असून या घटनेत स्कूल व्हॅन जळून खाक झाली.

पोलीस शिपायाची जागरूकता

म्हसरूळ परिसरात बोरगड येथे राहणारे अभिजित दळवी हे पोलीस शिपाई म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. दुपारी आरटीओ कार्यालयात दळवी यांचे काम होते. ते उरकून घराकडे परतत होते. त्यांच्या पुढे जाणार्‍या शालेय व्हॅनने अचानक पेट घेतला. यावेळी दळवी यांनी गाडीतील मुले व केअर टेकर यांना खाली उतरवत दूर नेऊन उभे केले. त्यांनी ही बाब कंट्रोलला कळवली आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु, आगीने उग्र रूप धारण केले. यावेळी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे घटनास्थळी पोहोचले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -