घरताज्या घडामोडीनाशिकचे बांधकाम व्यावसायिक रत्नाकर पवार यांना कोठडी

नाशिकचे बांधकाम व्यावसायिक रत्नाकर पवार यांना कोठडी

Subscribe

कोंढवा पोलिसांची कारवाई; आज न्यायालयात हजर करणार

नाशिकlभागीदारीत एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाने पैसे घेऊन ते प्रकल्पात न गुंतविता फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी नाशिकचे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक तथा जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांचे पती रत्नाकर पवार व अशोक अहिरे यांना अटक केली आहे.त्यांना न्यायालयात हजर केले असता दि.27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील कोंढवा येथील मोहद्दीस महंमद फारुख बखला यांनी फिर्याद दिली आहे. बखला यांची स्वत:ची टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्स तसेच ड्रीम होम कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. दस्तागीर पटेल हे बखला यांचे भागीदार असून त्यांना फेब्रुवारी 2017 अनिस मेमन यांनी इतर संशयीत आरोपींशी ओळख करुन दिली. नाशिक येथील रत्नाकर पवार यांच्या मालकीच्या गिरणा इंफ्रा प्रोजेक्ट व इतर ठिकाणी पैसे गुंतविल्यास भरपूर फायदा मिळेल असे यावेळी सांगितले.

- Advertisement -

त्यांच्याबरोबर करार करुन त्या बदल्यात संशयीत आरोपींना आकर्षक मोबदल्याचे प्रलोभन दिले. त्यानुसार बखला यांनी संशयित आरोपींना एक कोटी 64 लाख 16 हजार रुपये दिले. मात्र, संशयित रत्नाकर पवार यांनी ही रक्कम गिरणा इन्फ्रा व अन्य कुठल्याही प्रकल्पात गुंतवली नाही. त्यामुळे बखला यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात याविरोधात फिर्याद दाखल केली.

लॉकडाऊननंतर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरु झाल्यानंतर 2 जून रोजी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रत्नाकर पवार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर कोंढवा पोलीस त्यांचा शोध घेत होते. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार (गुन्हे) यांनी सांगितले की, रत्नाकर पवार आणि अशोक अहिरे यांना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी यापूर्वी काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणात परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, पोलीस हवालदार विशाल गवळी, पोलीस नाईक नितीन कांबळे यांनी केली आहे.

- Advertisement -

कोण आहेत रत्नाकर पवार?
रत्नाकर पवार हे नाशिक जिल्हा परिषदेतील भाजपच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांचे पती आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. नाशिक महापालिकेशी संबंधित कोट्यवधींची कामे यापूर्वी पवार यांच्या कंपनीमार्फत करण्यात आलेली आहेत.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -