नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, वर्ल्ड रिसोर्सेस इंस्टीट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय इंडिया) ही संस्था, नाशिक महानगरपालिकेसोबत नाशिक शहरासाठीचा वातावरणीय बदल कृती आराखडा (क्लायमेट अॅक्शन प्लान- CAP) तयार करत आहे. महाराष्ट्र राज्यातील ४३ शहरे आणि नागरी समूहांसह शाश्वत विकास आणि वातावरणीय बदलावर काम करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट् शासनाच्याच्या एकत्रित प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या तांत्रिक सहाय्याने, २०२२ मध्ये नाशिक शहराच्या पहिल्या वातावरणीय बदल कृती आराखड्यावर काम करण्यास सुरुवात करण्यात आली होती. ह्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, महानगरपालिकेने नाशिक शहराच्या वातावरणीय बदल कृतीच्या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्यासाठी भागधारकांच्या अर्धा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी (दि. ९) करण्यात आले होते.
महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेची सुरुवात झाली. उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी कार्यशाळेची रूपरेषा तसेच ह्या आभ्यासाची पार्श्वभूमी सांगितली. महानगरपालिकेचे अधिकारयांसह सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ अशा शहरातील अनेक भागधारकांचा यात सहभाग होता.
पहिल्या सत्रात या आराखड्याअंतर्गत नाशिक शहराशी संबंधित विविध वातावरणीय बदलामुळे होऊ शकणाऱ्या धोक्यांबद्दलचे विश्लेषण करण्यात आले. नाशिक शहर सध्या चार प्रमुख धोकयांना सामोरे जाते आहे. त्यात शहरी उष्णता, वायू प्रदूषण, शहरी पूर तसेच पाणी साचणे आणि भूजल पातळी कमी होणे या बाबींचा समावेश आहे. त्याचा शहरातील रहिवासी, उपजीविका आणि पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. नाशिक शहराची पहिली हरितगृह वायू उत्सर्जन सूची देखील शहर अधिकार्यांना सादर करण्यात आली तसेच त्यांचे स्रोतही नमूद करण्यात आले.
पुढील सत्रात वाहतूक, ऊर्जा, इमारती, घनकचरा व्यवस्थापन, वायू प्रदूषण, पाण्याशी संबंधित, हिरवळ आणि शहरी उष्णता यासह क्षेत्रांमध्ये डब्ल्यूआरआय इंडियाच्या टीमने केलेल्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेने शहरातील शाश्वत विकासाच्या माध्यमातून वातावरणीय बदलाचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे. वाढणारे तापमान, शहरी पूर, भूजल पातळी कमी होणे आणि वायू प्रदूषण यांसारख्या वातावरणीय बदलाशी संबंधित समस्यांचा सामना करण्याच्या उद्देशाने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेचे अध्यक्ष महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. यांसह उपायुक्त विजयकुमार मुंडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, हर्षल बाविस्कर, उदय धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले.