चैतन्याची अनुभूती, शिवजयंतीसाठी अवघे शहर भगवेमय

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६१ फुटांच्या मूर्तीचे खास आकर्षण

नाशिक : संंपूर्ण शहरात शिवजयंतीच्या तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला असून संपूर्ण नाशिक शहर भगवेमय झाल्याने चैतन्याची अनुभूती येत आहे. आज साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीसाठी बालगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्सुक झाले आहेत. यानिमित्ताने शहरातील चौकाचौकात शिवजयंतीचे भव्यदिव्य असे वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले आहेत.

भद्रकाली परिसरातील गाडगेबाबा चौकात पन्हाळगडावर चढुन गेलेल्या ‘यशवंती’ या घोरपडीचा आकर्षक देखावा चित्त वेधुन घेतो तर मेहबुबिया मस्जिद चौकात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासह किल्ल्याची प्रतिकृती लक्ष वेधुन घेते. भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा किल्ल्यासमोर उभारण्यात आला असुन हा देखावा नजर खिळवून ठेवतोे. इंदिरानगर येथील रथचक्र चौकात छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा तर अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी पृथ्वीमातेसह अखंड भारताची प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे. सीबीएस परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात आदर्श शिवजन्मोत्सव साजरा करणार्‍या छत्रपती सेनेतर्फे शुक्रवारी (दि.१७) २१  फुट लांबीची व ७१ किलो वजन असलेल्या ६४  कवड्यांच्या माळेचे पूजन करण्यात आले . कवड्यांची माळ आज छत्रपतींना अर्पण करण्यात येणार आहे. अशोकस्तंभ शिवमंडळातर्फे गगनचुंबी इमारतीपेक्षाही मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची ६१  फुट लांबी, २२  फुट रुंदी असलेली, ३  हजार किलो वजनाची छत्रपतींचा रुबाबदार पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.

सिडकोतील त्रिमुर्ती चौक देखील भगवामय झाला असुन याठिकाणी आकर्षक शिवदेखावा सादर करण्यात आला आहे. उंटवाडी ते मोरवाडी आणि विजयनगर ते लेखानगरपर्यंतच्या परिसरात नवीन नाशिक शिवजयंती समितीने ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्याल्या आहेत. शिवमय देखणा सोहळा नेत्रांत साठविण्यासाठी सिडकोवासी आतुर झाले आहेत. नवीन नाशिक सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे फलक उंटवाडी, त्रिमूर्ती चौक, सावतानगरपासून उत्तमनगर, शुभमपार्क, उपेंद्रनगर, विजयनगरपर्यंत लावल्याचे पहावयास मिळते आहे. राजरत्ननगर, पवननगर, रायगड चौक, सावतानगर, दिव्या अ‍ॅडलॅब, पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक मार्गे हेडगेवारनगर या भागातही मोठ्या प्रमाणावर आकर्षक असे शिवदेखावे सादर करण्यात आले आहे. पंचवटी परिसरातील गजानन चौक मित्रमंडळ, सेवाकुंज मित्रमंडळ, कृष्णनगर मित्रमंडळ, पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ, मालविय चौकातील धुम्रवर्ण फ्रेंड सर्कल, गुरूदत्त शैक्षणिक, सामाजिक कला, क्रिडामंडळ, मालेगाव स्टँन्ड मित्रमंडळ, शंभूराजे फ्रेंड सर्कल, सरदारचौक मित्रमंडळ, हिरावाडी मित्रमंडळ, भगवती शैक्षणिक कला, क्रिडामंडळ, आदिंसह मेरी, म्हसरूळ, आडगाव, नांदूर मानूर, तारवालानगर, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, पंचवटी कारंजा भागात शिवजयंतीनिमित्त आकर्षक देखावे सादर करण्यात आले आहेत. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणा देण्यासाठी शिवसैनिक आतूर झाले असुन आज साजर्‍या होणारा शिवजयंती उत्सव संस्मरणीय ठरणार आहे.

शिवदेखाव्यांची भव्यता, दिव्यता यासाठी नाशिकरोडचा शिवजन्मोत्सव ओळखला जातो. यंदाही भव्यदिव्य अशा रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. भवानी मातेच्या मुर्तीपुढे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा चैतन्याचा साक्षात्कार करुन देत आहे. तर जेलरोड परिसरातील शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती बालशिवाजीची आठवण करुन देत आहे. शिवसैनिकांचा उत्साह बघता यंदाचा शिवजन्मोत्सवही दणक्यात साजरा होणार यात शंका नाही. नाशिकरोडमध्ये मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह रक्तदान शिबीरही घेण्यात येत असून आज दुपारी ४ वाजता येथे १५१ महिला व पुरुषांकडून शंभुनाद करण्यात येणार आहे.

महाशिवरात्र-शिवजयंतीमुळे उत्साह द्विगुणीत

महाशिवरात्री आणि शिवजयंती लागोपाठ आल्याने शहरात एक वेगळेच दिव्य चैतन्य अनुभवास येत आहे. यंदा शिवभक्तांनी शिवजयंतीसाठी कुठलीच कसर बाकी ठेवली नसून संपूर्ण नाशिक शहरात ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिशबाजीत, डीजेच्या तालावर नाचायला शिवभक्त सज्ज झाले आहेत. जुने नाशिकपासून नाशिकरोडपर्यंत, सिडकोपासून पंचवटीपर्यंत सर्वत्र उत्साह, जोशचे वातावरण आहे. पोलिस ही सतर्क असून शिवजयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करावी असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.