नाशिक – दिल्ली विमानसेवेचा मुहूर्त टळला

१५ जूनपासून सेवा सुरू करण्याचा मुहूर्त टळल्याने नाशिककरांना करावी लागणार प्रतिक्षा

Airplanes
प्रातिनिधिक फोटो

आर्थिक गर्ततेत सापडलेल्या जेट एअरवेजची बंद पडलेली नाशिक दिल्ली विमानसेवेचा स्लॉट अलायन्स एअर कंपनीला देण्यात आला. कंपनीने १५ जूनपासून ही सेवा सुरू करण्याचा मुहूर्तही निश्चित केला. मात्र, आता विमान उपलब्ध नसल्याचे कारण देत हा मुहूर्त टळला आहे. त्यामुळे नाशिककरांना दिल्ली सेवेसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नाशिककरांना थेट राजधानी दिल्लीशी जोडणारी विमानसेवा गेल्या वर्षी १५ जून २०१८ रोजी सुरू झाली. जेट एअरवेज कंपनीने उडान योजनेअंतर्गत आठवड्यातून ती दिवस ही सेवा सुरू केली. या सेवेला प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रवासी आणि कार्गो या दोन्हीची वाहतूक या सेवेद्वारे होत होती. मात्र, जेट एअरवेज कंपनी आर्थिक गर्तेत अडकली. त्यामुळे एप्रिल महिन्यात जेट एअरवजेची सर्व उड्डाणे जमिनीवर आली. मोठा प्रतिसाद असूनही त्याचा फटका नाशिकच्या सेवेलाही बसला. सेवा बंद झाल्याने नाशिककरांची मोठीच निराशा झाली. जेट एअरवेजचे महत्त्वाच्या शहरांना जोडणारे स्लॉट अन्य कंपन्यांना देण्यात आले. याच धर्तीवर नाशिक-दिल्लीचा स्लॉटही अन्य कंपनीकडे देण्यात यावा, अशी आग्रही मागणीही केली गेली. विमानतळाची मालकी हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीकडे आहे. त्यामुळेच ‘एचएएल’कडूनही दिल्ली सेवेबाबत आग्रह धरला जात होता. त्यासाठी एअर इंडिया, अलायन्स एअर, विस्तारा, एअर एशिया, गो एअर, इंडिगो, स्पाईसजेट या कंपन्यांना पत्रही पाठवण्यात आले.

एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे. त्यामुळे दिल्ली सेवेला मिळणार्‍या प्रतिसादाची दखल अलायन्स एअरने घेतली. त्यानुसार कंपनीने हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठवून जेट एअरवेजच्या स्लॉटची मागणी केली. अखेर ही विनंती मान्य करण्यात येऊन १५ जूनपासून नाशिक-दिल्ली ही सेवा सुरू करण्याचे कंपनीने निश्चित केले. मात्र, विमान उपलब्ध नसल्याचे कारण देत कंपनीने हा मुहूर्त पुढे ढकलल्याचे सूत्रांनी सांगितले. साधारणपणे सप्टेंबरनंतरच ही सेवा सुरू होऊ शकेल, असेही सूत्रांकडून समजते.