घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्हा बँक : बोगस कर्जप्रकरणांतून गटसचिव 'कोरडे'ने जमवली कोट्यवधींची माया

नाशिक जिल्हा बँक : बोगस कर्जप्रकरणांतून गटसचिव ‘कोरडे’ने जमवली कोट्यवधींची माया

Subscribe

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वणी कार्यकारी सोसायटीत झालेल्या १ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत असून, याप्रकरणातील संशयित गटसचिव दत्तात्रय कोरडे यांनी काही खातेदारांची बोगस कर्ज प्रकरणे बनवूनन कर्जाची रक्कम परस्पर हडप केली आहे. अशापद्धतीने कोरडे यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली असून, याची व्याप्ती केवळ १ कोटींपर्यंत मर्यादित नसून, अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

वणी विविध कार्यकारी सोसायटीत १ कोटी रुपयांचा अपहार झाला. याप्रकरणाला आपलं महानगरने वाचा फोडल्यानंतर याबाबत अनेक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. गटसचिव दत्तात्रय कोरडे यांनी सोसायटीच्या स्थानिक अधिकार्‍यांशी संगनमत करुन काही खातेदारांच्या नावे बोगस कर्जप्रकरणे मंजूर करुन घेतली. कर्ज प्रकरणाची रक्कम कोरडे यांनी सभासदांच्या नकळत स्वत:च्या खिशात घातली. याबाबत ज्या सभासदांना माहिती झाली त्यांनी सोसायटीमध्ये तक्रारी दाखल केल्या. तक्रारी करणार्‍या सभासदांना कोरडे यांनी परस्पर ना हरकत दाखले दिले. या दाखल्यांवर निरीक्षक किशोर गांगुर्डे यांच्याही सह्या दिसून येत आहेत. तर, उर्वरित दाखल्यांवर कोरडे यांनी सह्या केल्या आहेत.

- Advertisement -

हा प्रकार अतिशय गंभीर असून, यामुळे गटसचिवांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेत गटसचिवांच्या प्रोत्साहन निधीच्या अपहाराचे प्रकरण गाजत असताना दुसरीकडे वणी सोसायटीत गटसचिवानेच अधिकार्‍यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याने बँकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. या कर्जाच्या पैशांवर सचिव कोरडे यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याची चर्चा आहे. याबाबत बँक अधिकार्‍यांनी केवळ चौकशीचे सोपस्कार पार न पाडता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

वणी कार्यकारी सोसायटीतील गट सचिव दत्तात्रय कोरडे आणि जिल्हा निरिक्षक तथा वसूली अधिकारी किशोर गांगुर्डे यांनी केलेला अपहार हा गंभीर स्वरुपाचा असून, याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यास तात्काळ गुन्हे दाखल केले जातील. : फैयाज मुलानी, जिल्हा उपनिबंधक

दोषींवर कठोर कारवाई करा

 जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या निधी अपहारप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा आहिरे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले असून, सक्तीच्या रजेवर पाठविलेले वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे आणि वाय. के. पाटील यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत गट सचिवांच्या निधीच्या नावाखाली बँकेचे अधिकारी शैलेश पिंगळे आणि वाय. के. पाटील आणि काही गटसचिवांनी संगनमताने बेकायदेशीरपणे या पैशांचा अपहार केला असल्याचा संशय आहे. हा पैसा सर्वसामान्यांचा असून, त्यावर या अधिकार्‍यांनी डल्ला मारला आहे. त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आहिरे यांनी केली. दरम्यान, वादग्रस्त मुख्याधिकारी शैलेश पिंगळे आणि वाय. के. पाटील यांच्या सक्तीच्या रजेची मुदत संपत आली असून, त्यांना चौकशी होईपर्यंत निलंबित करावे, असेही आहिरे यांनी
म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -