स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक पुन्हा नापास

क्रमवारीत अकरावरून सतराव्या स्थानी घसरण; राज्य क्रमवारीतही घसरण

nmc

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात नाशिककरांचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. मागील वर्षी अकराव्या स्थानी असताना पहिल्या दहामध्ये येण्याचा निश्चय करण्यात आला होता. परंतू, यंदा क्रमवारीत घसरण होऊन थेट सतराव्या स्थानावर नाशिक स्थिरावल्याने स्वच्छतेच्या बाबतीत आणखी मोठी झेप घ्यावी लागणार आहे. इंदूर शहराने सलग पाचव्यांदा स्वच्छतेचा पहिला क्रमांक पटकाविला, तर नवी मुंबई व पुणे शहर अनुक्रमे देशपातळीवरील क्रमवारीत चौथे व पाचव्या स्थानावर आले आहे. राज्य पातळीवरील क्रमवारीत नवी मुंबई पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर राहिले तर दुसर्‍या स्थानावर असलेले नाशिक यावर्षी चौथ्या स्थानावर पोहोचले.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सन २०२१ या पाचव्या स्वच्छ सर्वेक्षणाची घोषणा केंद्रीय गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने आज केली. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार मार्च २०२१ मध्ये निकाल जाहीर होणे अपेक्षित होते परंतू कोरोनामुळे निकाल जाहीर होवू शकला नाही. मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात अकरावे स्थान होते. त्यामुळे पहिल्या दहा शहरामध्ये क्रमांक मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात १७ वा क्रमांक मिळाला. पहिल्या दहा शहरांमध्ये अनुक्रमे इंदूर, सुरत, विजयवाडा,नवी मुंबई, पुणे, रायपुर, भोपाल, वडोदरा, विशाखापट्टणम्, अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. नाशिक महापालिकेला सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस गटात २४०० पैकी २०८०.२७ गुण मिळाले, सर्टिफिकेशन मध्ये १८०० पैकी ७००, प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांच्या प्रतिक्रिया वर्गात १८०० पैकी १४६७.७८ असे एकुण सहा हजार पैकी ४२४८.०५ गुण मिळाले. सिटीझन फिडबॅकमध्ये नाशिककर कमी पडले, तसेच बांधकाम साहित्याच्या पुर्नप्रक्रियेसाठी महापालिकेने व्यवस्था न केल्याने गुणानुक्रम घसरला. नवी मुंबईच्या तुलनेत नाशिकला १०५९.६३ तर पुणे शहराच्या तुलनेत ६५२.८९ गुण कमी मिळाले.

sanitation survey

फिडबॅक व बांधकाम साहित्याची विल्हेवाट या घटकांमध्ये कमी गुण मिळाले. सन २०२२ च्या स्पर्धेत या दोन्ही घटकांवर काम करून पहिल्या पाच मध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करू.
                          – कैलास जाधव, नाशिक महापालिका आयुक्त