घरताज्या घडामोडीगुलाबवाडीचा मनोज स्वगृही परतला

गुलाबवाडीचा मनोज स्वगृही परतला

Subscribe

मित्र मंडळींसोबत खेळत असताना लघुशंका झाली. त्याच्यासाठी एक्सप्रेसमध्ये चढलेल्या नाशिक गुलाबवाडीचा ९ वर्षीय मनोज हा ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटमुळे अखेर सुखरूप स्वगृही परतला आहे. सार्वजनिक शौचालय व अण्णाचे दुकान या माहितीवरून त्याच्या पालकांचा या युनिटने अवघ्या एका दिवसात शोध घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगर येथील शासकीय मुलांचे बालगृहाला ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनीटने २१ मार्च रोजी भेट दिल्यावर समुपदेशक तथा प्रभारी परिविक्षा अधिकारी संतोष दत्तत्रय खोपडे यांनी २० मार्च रोजी ९ वर्षाचा मनोज नामक मुलगा हा संस्थेत दाखल झाला असुन तो नाशिक येथे राहणारा आहे व त्याला पूर्ण पत्ता सांगता येत नाही अशी माहिती दिली. त्यानुसार या युनीटने सुरुवातीला त्याचा विश्वास संपादन केले आणि बारकाईने विचारपुस करुन तो रहात असलेल्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय व अण्णाचे दुकान या माहीती वरुन मुलगा मनोज हा गुलाबवाडी, नाशिक येथे राहत असल्याची माहीती काढून घेतले. तसेच त्याने आपले पूर्ण नाव सांगितले. त्याच्या आधारे नाशिक शहरात गुलाबवाडी परिसर कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो याबाबत माहीती घेवुन त्या मुलाच्या पालकांचा शोध घेत त्याला पालकांच्या स्वाधीन केले अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

” नाशिक रेल्वे स्टेशन परिसरात राहणारा ९ वर्षीय मनोज हा खेळता खेळता लघुशंका झाल्याने सहज उभ्या असलेल्या एक्सप्रेसमध्ये चढला. याचदरम्यान ती गाडी सुटल्याने तो थेट कल्याणला आला. फिरत असताना त्याला पोलिसांनी बालसुधारगृहात आणले. तसेच त्याने सांगितलेल्या पत्त्यावरून शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.”

– प्रिती चव्हाण , सहाय्यक पोलीस निरीक्षक, चाईल्ड प्रोटेक्शन युनिट, ठाणे शहर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -