घरमहाराष्ट्रनाशिककेंद्राच्या ‘टॉप’ योजनेत नाशिकचा समावेश

केंद्राच्या ‘टॉप’ योजनेत नाशिकचा समावेश

Subscribe

खासदार गोडसे यांनी गत पाच वर्षांतील विकास कामांचा अजेंडा मांडला.

देशामध्ये आणि देशाबाहेर नाशिक जिल्ह्यातील कांद्याने देशाच्या आंतर्बाह्य ओळख निर्माण केली आहे. देशात टोमॅटो, कांदा, आणि बटाटा पिकांसाठी ‘टॉप’ (टोर्मटो, ओनियन, पोटॅटो) योजना मंजूर करण्यात आली आहे. यात नाशिकचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागाचा समावेश असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात औद्योगिक विकासासह दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रकल्प पूर्णत्वास नेणे यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी माय महानगर फेसबुक लाईव्हवर ‘खुल्लम खुल्ला’ या टॉक शोमध्ये केले. ‘आपलं महानगर’चे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी त्यांचे स्वागत केले.

खासदार गोडसे यांनी गत पाच वर्षांतील विकास कामांचा अजेंडा मांडला. ग्रामीण आणि शहरी भागाच्या समस्या वेगवेगळया आहेत. ग्रामीण भागात शेतकर्‍यांसाठी प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, शेतकर्‍यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्यासाठी कृषी टर्मिनल मार्केट तसेच मोठे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करणे, यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतमालाला भाव मिळावा, अशी शेतकर्‍यांनी मागणी आहे. देशात कांदा, टोमॅटो, आणि बटाटा या पिकांचे भाव कमी अधिक झाल्यास शेतकर्‍यांसह नागरिकांनाही त्याचा फटका बसतो. यात सुसूत्रता आणून उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होण्यासाठी शासनाने ‘टॉप’ नावाची योजना तयार केली आहे. या शेतकर्‍यांसाठी क्लस्टर विकसित केले जाणार आहे. सहकारी संस्था, शेतकर्‍यांचे गट, शेतकरी कंपन्या यापैकी कुणीही क्लस्टरसाठी अर्ज करू शकणार आहे. वितरण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच या पिकांवर आधारित उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात नाशिकचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सिन्नरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी दमणगंगा- एकदरे व अप्पर वैतरणा- कडवा- देवनदी जोड प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली असून राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात या प्रकल्पांचा सामावेश करण्यास तत्वता मान्यता दिल्याने भविष्यात सिन्नर टंचाईमुक्त होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. औद्योगिक विकासासाठी मेक इन नाशिक, व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम, आय.टी.उद्योजकांसाठी स्टार्टअप उपक्रम राबवण्यात आले. उद्योगवाढीसाठी रस्तेविकास, विमानसेवा, रेल्वेसेवा आदींसह पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉरचा दुसरा टप्पा सुरू व्हावा, यासाठी यापुढील काळात पाठपुरावा करण्यात येईल. तसेच नाशिकमध्ये घोषित करण्यात आलेले डिफेन्स इनोव्हेशन हब लवकरात लवकर स्थापन होण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन विकासासाठी प्रसाद योजनेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरचा विकास केला जात आहे. औद्योगिक विकासाबरोबरच कृषी उद्योग स्थापन करण्यास माझे प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासाचा अजेंडा

  • कृषी टर्मिनल मार्केट लवकर सुरू करणार
  • फळप्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी पाठपुरावा सुरू
  • नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सिन्नरचा पाणीप्रश्न सोडवणार
  • दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरीडोरचे दुसर्‍या टप्प्यातील काम सुरू करणार
  • नाशिक- कल्याण लोकल लवकर सुरू करणार
  • दळणवळण सुविधा वाढवण्यावर भर
  • मेट्रोसाठी प्रयत्न सुरू.
  • नाशिकमध्ये वॅगन दुरुस्ती प्रकल्पासाठी पाठपुरावा
  • नोटप्रेसचे आधुनिकीकरण करणार
  • डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी पाठपुरावा
  • आय. टी. इंडस्ट्रीसाठी प्रयत्नशील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -