नाशिक बाजार समिती घेणार साखर कारखाना चालवायला

येत्या शुक्रवारी संचालकांच्या बैठकीत होणार चर्चा; शासनाची परवानगीही घ्यावी लागणार

Nasaka Nashik

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आस लागून असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) पुन्हा चालू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, त्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आता पुढाकार घेतला आहे. त्यासंदर्भात येत्या शुक्रवारी (दि.९) नाशिक बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.

निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या कै.अशोकराव बनकर पतसंस्थेने चालवण्यास घेतला आहे. त्याच धर्तिवर नाशिक सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा आजवर अनेकदा प्रयत्न झाला. हा कारखाना २०१२ पासून बंद आहे. त्याच्यावर सुमारे कर्ज १३० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. कारखान्याशी निगडीत १०० कामगार आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या अनेक अडचणी आहेत. कारखाना सुरु करण्यासाठी आजवर झालेले अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या प्रयत्नांना यश येणार का? याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.

आतापर्यंत तीन प्रयत्न

युती सरकारच्या काळात समिती स्थापन करुन कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न झाला. यात जिल्हा बँकेने कारखाना भाडेतत्वाने देण्याचा निर्णय घेत दोन निविदा काढल्या. त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे १२५० मेट्रीक टन क्षमता असल्याने, मशिनरी जुनी आहे. त्यामुळे इतर पुरक उद्योग नसल्याने इतर मोठे युनिट व कंपन्यांनी उत्सुकता दाखवली नाही. कारखाना १० वर्षांपासून बंद राहिल्याने आमदार सरोज आहिरे यांनी मंत्रालयात बैठकी घेऊन कारखाना सुरु करण्याचे प्रयत्न केले. त्या पद्धतीने भूमिका मांडली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडेही बैठक झाली. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार विभागातील अधिकारी, जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी, व कारखाना कामगार संघटनेचे विष्णुपंत गायखे, बाळासाहेब गायधनी, नामदेव बोराडे या प्रतिनिधींसह बैठक झाली.

या बैठकीतील चर्चा

  • कारखाना सुरु करण्यासाठी देशपातळीवरुन निविदा मागवण्यात यायला हव्यात.
  • इथेनॉल व ऑक्सिजन प्रकल्पाला राज्य शासनाने परवानगी द्यावी.
  • शासनाच्या नियमानुसार किमान १५ वर्षांचा करार करुन द्यावा
  • कारखाना दुरुस्ती व नव्याने प्रकल्प सुरु करण्यासाठी १०० कोटींचा प्रस्ताव आवश्यक
  • कारखान्याचे कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कारखान्याची जमिन विक्री करता येणार नाही

नाशिक साखर कारखाना सुरु व्हायला हवा ही येथील शेतकर्‍यांची इच्छा आहे. परंतु, यापूर्वी झालेल्या प्रक्रियेत दुसरे कोणी चालवण्यासाठी घेत असेल तर त्याला आमची हरकत नाही. कारखाना चालवण्यास कुणीच तयार होत नसेल तर नाशिक बाजार समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तसा ठराव करण्यात येईल.
– देविदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती