घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिका : सर्वार्थाने अग्रेसर, प्रगतीपथावर

नाशिक महापालिका : सर्वार्थाने अग्रेसर, प्रगतीपथावर

Subscribe

मंदिरांचे शहर ते स्मार्ट सिटी नाशिक होण्यात महापालिकेच्या २९ वर्षांच्या कारकिर्दीचा मोठा हातभार

मंदिरांचे शहर ते स्मार्ट सिटी असा प्रवास करणारं नाशिक आता विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलंय. महापालिकेच्या २९ वर्षांच्या कारकिर्दीचा यात मोठा हातभार आहे. मुलभूत सुविधा पुरवतानाच नागरी जीवन सुसह्य कसे होईल, लोकांची जीवनशैली अधिक कशी उंचावेल यासाठी महापालिकेने ४० वर्षात मोठे प्रयत्न केले आहेत. अरुंद रस्त्यांचं नाशिक आता भव्य रस्त्यांचं झालंय. रिंगरोडचा ‘नेकलेस’ शहराला घातला गेल्यानं नाशिकच्या सौंदर्यात वाढ झालीच; शिवाय ‘कनेक्टिव्हीटी’ही वाढली. सिंहस्थ निधीमुळे शहरातील मुलभूत कामांना झळाळी मिळते. याशिवाय केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतील कामांनीही शहराला नवा आयाम मिळणार आहे. कोरोना काळात तर महापालिका प्रशासनाने केलेले काम अव्दीतीय असेच म्हणावे लागेल. या काळात पालिकेतील कोरोना योध्यांनी विषाणूशी चार हात करीत शहरवासियांच्या प्राणासाठी लढा उभा केला. त्यात महापालिकेच्या काही कर्मचार्‍यांना जीवही गमवावा लागला. परंतु कर्तव्याला प्राधान्य देत सर्वच अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या काळात एकजुटीने कोरोनाचा प्रभाव कमी केला. आता कथीत तिसर्‍या लाटेला सामोरे जातानाही महापालिका प्रशासनाने पुरेशी वैद्यकीय तयारी करुन ठेवली आहे. मुबलक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेडस आणि तत्सम सुविधा यांची आता वाणवा भासणार नाही. महापालिकेचे आयुक्त मा. कैलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रशासन नाशिकला ‘नंबर वन’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती आणि आरोग्य संवर्धन यांची प्रामुख्याने जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या व्यवस्थेत गेल्या ३० वर्षांत महत्वपूर्ण बदल झाले आहेत. मुलभूत सुविधा पुरवण्याबरोबर आपलं शहर ‘स्मार्ट’ करण्याची जबाबदारी पालिका बखुबी निभावत आहे. दुसरीकडे सिंहस्थासारख्या महामेळ्याच्या नियोजनातही पालिका महत्वपूर्ण भूमिका बजावताना दिसते. औद्योगिक व नागरी महत्त्व लक्षात घेऊन शहरातील नागरिकांना सर्व नागरी सोयी सुविधा पुरविण्यासाठी आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सन १९८२ मध्ये महाराष्ट्र शासनाने नाशिक महापालिकेच्या स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. दिनांक ७ नोव्हेंबर १९८२ रोजी त्या वेळी ११८ वर्षांपासून अस्तित्वात असलेली नाशिक रोड देवळाली नगरपालिका व दहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली सातपूर नगरपालिका तसेच त्या लगतच्या २२ खेड्याचे विलीनीकरण करून नाशिक महापालिका अस्तित्वात आली. महापालिका स्थापनेच्या सन १९८२ ते २०२२ या ४० वर्षांच्या यशस्वी वाटचालीत सुरुवातीला दहा वर्ष प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर गेल्या ३० वर्षापासून लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने गेल्या ४० वर्षात नाशिक महापालिकेने मोठ्या प्रमाणावर नागरी विकास कामे करून संपूर्ण महाराष्ट्रात प्रगतीकडे झेप घेणारी महानगरपालिका असा नावलौकिक मिळवला आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका सातत्याने आधुनिक पद्धतीचा अवलंब करून विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या माध्यमातून भविष्याचा वेध घेऊन महत्त्वकांक्षी योजना प्रत्यक्षात आणल्या जात आहेत. शहरातील नागरिकांना तसेच नाशिक पुण्यनगरीला भेट देणार्‍या भाविकांना पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी त्रास सोसावा लागणार नाही याची दक्षता महापालिका प्रशासनातर्फे घेतली जात आहे. आरोग्य, स्वच्छता, शुद्ध पाणी, रस्ते, पथदीप, भूमिगत गटारी यांसारख्या मूलभूत गरजा पुरवताना सामाजिक एकता कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात महापालिकेने प्रगती साधली आहे.

शहराची वाढती लोकसंख्या व औद्योगीकरणाची वाढती गती विचारात घेता नाशिक महापालिकेतर्फे पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, विस्तीर्ण रस्ते, हायमास्ट, नमामी गोदा प्रकल्प, गोदावरी कृती योजना, सुसज्ज व अद्ययावत रुग्णालये, क्रीडांगण, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खतप्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्रे, मलनिस्सारण योजना, अभ्यासिका, समाज मंदिर, व्यायाम शाळा, उड्डाणपूल, पथदीप, भुयारी मार्ग, अद्ययावत नाट्यगृह, दादासाहेब फाळके स्मारक, बुद्ध स्मारक, वॉटर पाकर्, एकात्मिक विकास रस्ते प्रकल्प, थेट पाईपलाईन योजना, शहराच्या मुख्य रस्त्यांवर प्रवेशद्वार, रामदास स्वामी स्मारक, झोपडपट्टी निर्मुलनासाठी घरकुल योजना तसेच सुवर्ण जयंती रोजगार योजनेअंतर्गत महिला बचत गटांची निर्मिती करून दारिद्रयरेषेखालील महिलांचा विकास, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, वनौषधी उद्यान, अहिल्यादेवी होळकर पूल येथे इंद्रधनुषी धबधबा, शंभर फुटी कारंजा, मुकणे धरण थेट पाणी पुरवठा योजना, वृक्षारोपण, चौक सुशोभिकरण, मनपा कर्मचार्‍यांना सोयी-सुविधा पुरवणे, नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी लोकशाही दिन, नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी इ कनेक्ट अ‍ॅप्लीकेशन,मंजुरी मिळालेली पहिली टायरबेस्ड निओ मेट्रो, सुसज्ज अग्निशमन दल आदींच्या माध्यमातून नाशिक महापालिका शहराच्या विकासाकडे मार्गक्रमण करीत आहे.

- Advertisement -

कोविडच्या काळात केवळ आणि केवळ रुग्णसेवेला केंद्रभूत ठेवत महापालिका कार्यरत होती. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढल्याने महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष केंद्रभूत केले आहे. ऑक्सिजनचा पुरेसा साठा, साठवणुकीची व्यवस्था, व्हेंटिलेटर्स, बेडस्, सुसज्ज हॉस्पिटल्स आणि तत्सम बाबींची पूर्तता झालेली असल्यामुळे आगामी काळात रुग्णांना फारसा त्रास होणार नाही असे दिसते. तसेच सध्या केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या माध्यमातून नाशिक शहराचा कायापालट होत आहे. भविष्यातील महापालिका क्षेत्रातील संभाव्य लोकसंख्येसाठी पर्याप्त सुविधा उपलब्ध करून देता येणे शक्य होईल याद्वारे नाशिक शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे.

– नितीन गंभीरे (लेखक महानगरपालिकेचे प्र. जनसंपर्क अधिकारी आहेत)

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -