नाशिक महापालिका खरेदी करणार कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस

गटनेत्यांच्या बैठकीत ग्लोबल टेंडरला फाटा, मुंबई, पुणे, ठाणे पालिकांतील निविदांचा अभ्यास करुन खरेदीचा दर निश्चित होणार

Serum Institute has planned 200 million doses of kovax

कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा कमी करण्यासाठी महापालिकेने आता लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त कैलास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थात ग्लोबल टेंडरच्या प्रक्रियत होणारा संभाव्य कालापव्यय लक्षात घेता मुंबई, पुणे आणि ठाण्याच्या निविदांचे दर मागवण्यात येणार असून त्यात ज्यांनी कमी दर दिले आहेत, त्यांच्याकडून लस खरेदी केली जाणार आहे. या प्रक्रियेतून कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाने मान्यता दिल्यानंतर स्फुटनिक आणि फायजर लस खरेदीला प्राधान्य देण्यात येणार आहे. लसींच्या दरांबाबत मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकेशी चर्चा करण्यात येणार आहे.
जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय विभागातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून, दुसर्‍या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्य देण्यात आले. तिसर्‍या टप्प्यात ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध होत नसल्याने अनेकांना पहिला डोस घेतल्यानंतर दुसरे डोस मिळण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या १ मेपासून शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. मात्र तेवढ्या प्रमाणात डोसच उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश सर्वच लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडत आहे. पहिल्या डोसचा कालावधी पूर्ण होऊन दुसरा डोस घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. हा गोंधळ थांबवण्यासाठी शासनाने १८ ते ४४ वर्ष वयोगटाच्या लसीकरणाला तात्पुरती स्थगिती देत ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसर्‍या डोससाठी लस उपलब्ध करून दिली आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, लस घेण्याकरता नागरिक पुढे येत आहेत. मात्र लसचा पुरवठा अपुरा असल्याने अनेकांना खाली हात परत जावे लागते. शासनाकडून ऑगस्टपासून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होईल असा साधारणत: अंदाज आहे. तत्पूर्वी महापालिकेस लस उपलब्ध होत असल्यास ती खरेदी करणे योग्य होईल, असे महापौरांचे मत असून त्यांनी लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला होता. त्यानुसार लस खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार आहे. मात्र स्वतंत्र ग्लोबल टेंडर न काढता मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकांनी जे ग्लोबल टेंडर काढले आहेत त्यांचे दरांचा आढावा घेऊन त्यांच्याकडून या लस प्राप्त करुन घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच नाशिक महापालिकेसाठी किती लस खरेदी करावी याबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.आयुक्तांच्या दालनात झालेल्या या बैठकीस महापौर, आयुक्तांसह उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृहनेते सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते जगदीश पाटील, विलास शिंदे, शाहू खैरे, गजानन शेलार, नंदिनी बोडके, दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. सध्या सुरू असलेले लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धता, घरोघरी जाऊन लसीकरणाची व्यवस्था करणे, लवकरात लवकर लस उपलब्ध झाल्यास खाजगी कंपन्या, दवाखाने यांना लस उपलब्ध करून देणे, जेणेकरुन लसीकरण केंद्रावर होत असणारी गर्दी टाळता येणे शक्य होईल अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.