फरार भूमाफिया रम्मी राजपुतला अखेर अटक

आनंदवल्ली येथील खून प्रकरणी पोलीस होते शोधात, हिमाचल प्रदेशातून केली अटक

शहरातील भूमाफियांच्या टोळीचा म्होरक्या व आनंदवली येथील भूधारक वृद्धाच्या खुनाचा नियोजनबध्द कट रचून सुपारी देणारा संशयित आरोपी रम्मी राजपूत याला नाशिक पोलिसांनी हिमाचल प्रदेशमधून अटक केली. त्याला नाशिकमध्ये आणले जात आहे.

राजपूत याच्याविरुध्द मोक्कान्वये पोलीस आयुक्तांनी कारवाई केली होती. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयानेही त्यास फरार घोषित केले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

आनंदवली येथे फेब्रुवारी महिन्यात रमेश वाळू मंडलिक वृध्द भूधारकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा भूमाफियांच्या टोळीविरुध्द दाखल करण्यात आला होता.