अनधिकृत होर्डिंग्जवर नाशिक पोलिसांचा हातोडा

महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि शहर पोलिसांनी हाती घेतली संयुक्त मोहीम

Hoarding

नवीन नाशिक – नाशिक शहरात विनापरवानगी होर्डिंग लावण्यावर महापालिका आणि पोलिसांनी निर्बंध घातल्यानंतर, अशा होर्डिंग्जविरोधात आज सकाळपासून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहर विद्रुपीकरण सुरू होते.

पंचवटी, नवीन नाशिक, सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व आणि पश्चिम या सर्व सहा विभागांत होर्डिंग्जची बजबजपुरी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. होर्डिंग्ज लावणाऱ्या व्यक्ती व व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. होर्डिंग्जमुळे शहराचे होत असलेले विद्रुपीकरण व वाहतुकीला होणारा अडथळा यामुळे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी होर्डिंगमुक्त नाशिकची संकल्पना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने आज नवीन नाशिक परिसरातील होर्डिंग्ज हटवण्यासाठी कारवाई करण्यात आली. या मोहीमेत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी महापालिका विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, तसेच पोलीस व महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि महिला पोलीस सहभागी झाले होते.