नारायण राणेंचा २५ सप्टेंबरला ऑनलाइन जबाब

नाशिक पोलिसांचा निर्णय

मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण यांचा २५ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे नाशिक शहर पोलीस ऑनलाइन जबाब नोंदवून घेणार आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंची तक्रार केली होती. याप्रकरणात उच्च न्यायालयाने राणे यांचा जामीन मंजूर करताना १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी राणेंचा २५ सप्टेंबरला ऑनलाईन जबाब घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री राणे २ सप्टेंबर रोजी नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार होते. मात्र, गणेशोत्सवाचं कारण देत त्यांच्या वकीलांनी तारीख वाढवून घेतली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले आहे. यावेळी पोलीस त्यांना प्रश्न विचारणार आहे. राणेंच्या उत्तरानुसार पोलीस जबाब नोंदवून घेणार आहे. तसेच, आवश्यकता वाटल्यास पुन्हा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.