नाशिककरांची निर्बंधातून सुटका नाहीच

पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्याचा आढावा

crowd for shopping in thane market before lockdown
याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका संपूर्ण क्षेत्रात उद्या पासून दहा दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (छायाचित्र - गणेश कुरकुंडे)

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दुकानांच्या वेळा वाढवून देण्यासाठी व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार्‍या कोरोना आढावा बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत राज्यातील रूग्णसंख्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या तरी नाशिकसह राज्यातील निर्बंध ‘जैसे थे’च राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

बाजारपेठा, पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी, राजकीय कार्यक्रम यामुळे कोरोनाचा धोका अधिकच वाढण्याचा धोका आहे त्यामुळे निर्बंध अधिक कडक करा असे खुदद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत दृकश्राव्यपध्दतीने घेतलेल्या बैठकीत सांगितले. देशात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याबाबतही यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. परंतू दुसरी लाट ओसरत असतांना वीकेंड लॉकडाऊन हटवावा, दुकानांच्या वेळांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करत व्यापारी संघटनांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. नाशिकमध्ये आजमितीस १६६१ कोरोना रूग्ण आहेत. दररोज साधारण १५० ते २०० रूग्णांची वाढ होत आहे. त्यात बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी तिसर्‍या लाटेला आंमत्रण देणारी ठरू शकते. पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा करत कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता सध्या तरी कोणत्याही निर्बंध ‘जैसे थे’च ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हयात रूग्णसंख्या कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे निर्बंध शिथिल करणे तूर्त शक्य नाही.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी