नाकाला, तोंडाला नोटा चोळून कोरोनाची भीती दाखविणाऱ्या विकृताला अटक

man arrest in nashik

कोरोना संक्रमणाच्या दहशतीखाली संबंध देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन झालेला आहे. संक्रमण होऊ नये अनेक लोक काळजी घेत आहेत. सरकार आपल्यापरिने उपाययोजना आखत आहे. मात्र काही विकृत लोक आपली विकृती अशा संकटातही दाखवतात. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अशाच एका विकृताला अटक केली आहे. ‘ही अल्लाने दिलेली शिक्षा आहे’, असे म्हणत एक तरुण नाकाला आणि तोंडाला काही नोटा चोळत होता. हा व्हिडिओ गेले दोन दिवस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नाशिक पोलिसांनी आता याला बेड्या ठोकल्या आहेत.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. संबंधित व्यक्तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याचे ट्विट करण्यात आले आहे.

एका मुस्लिम व्यक्तीने हा व्हिडिओ बनवून टिक टॉकवर अपलोड केला होता. यामध्ये हा व्यक्ती ५०० च्या नोटा नाकाला आणि तोंडाळा चोळत आहे. “कोरोनाचा कोणताही ईलाज नाही, कारण ही अल्लाने तुम्हा लोकांना दिलेली शिक्षा आहे.”, असे वक्तव्य नोटा चोळताना करत आहे.

दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात तबलीग मरकज येथे आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे सध्या देशभरात तणाव पसरला आहे. त्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये असंतोष पसरत होता. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी वेळीच दखल घेत या व्यक्तिला शोधून अटक केल्यामुळे नाशिक पोलिसांचे कौतुक होत आहे.