घरमहाराष्ट्रनाशिकसंपूर्ण निवडणुकीत नाशिकच केंद्रस्थानी

संपूर्ण निवडणुकीत नाशिकच केंद्रस्थानी

Subscribe

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबईनंतर नाशिकच केंद्रस्थानी राहिले

प्रचार थंडावण्याच्या एक दिवस आधी राज ठाकरे यांनी घेतलेली यंदाची अखेरची सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर अखेरच्या दिवशी भर उन्हात घेतलेली सभा, तब्बल पाच सभा घेऊन शरद पवारांनी जिल्ह्यात पेटवलेले वातावरण, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या झालेल्या सभा, पालकमंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये काही दिवसांपासून ठोकलेला तळ, या सर्व घडामोडी बघता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबई नंतर नाशिकच केंद्रस्थानी राहिल्याचे पुढे आले.

नाशिक लोकसभा निवडणुकीत हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांची लढत युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याबरोबर होत आहे. त्यात माजी आमदार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्याही उमेदवारीने निवडणुकीत चुरस वाढविली. दुसरीकडे दिंडोरी मतदार संघात शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले माजी आमदार धनराज महाले व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या भारती पवार यांच्यात लढत होत आहे. माकपचे जे. पी. गावीत यांनीही निवडणुकीत रंगत भरली आहे. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदार संघाच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगाव बसवंत येथे आले होते. त्यानंतर उध्दव ठाकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा झाली. एकीकडे युतीच्या वतीने रान पेटवले जात असताना दुसरीकडे आघाडीची धुरा सांभाळण्यासाठी स्वत: शरद पवार नाशिकमध्ये पाच वेळा आले. त्यांच्या गिरणारे, सटाणा, नांदगाव, निफाड आणि सैयद पिंप्री येथे पाच सभा झाल्यात. या शिवाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, डॉ. अमोल कोल्हे यांनीही मतदार संघांत प्रचाराच्या तोफा डागल्या. राहुल गांधींचीही सभा सिन्नरला होणार होती. परंतु सुरक्षीततेच्या कारणास्तव ती रद्द करुन संगमनेरला घेण्यात आली.

- Advertisement -

निवडणुकीत सर्वाधिक चर्चेची ठरली ती राज ठाकरे यांची सभा. राज्यभरात त्यांच्या सभा झाल्या असल्या तरी नाशिकमध्ये नक्की ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे राज यांनी दत्तक बापाचा अर्थात मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतानाच व्हिडीओ क्लिपचा ‘बुक’ेही खुला केला. या सभेला दुसर्‍याच दिवशी म्हणजे शनिवारी २७ एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी दुपारी नाशिकमध्ये सभा घेऊन उत्तर दिले. या सर्व घडामोडी बघता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा विचार करता मुंबईनंतर नाशिकच केंद्रस्थानी राहिल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -